काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत ३३ टक्के ओबीसींना प्रतिनिधित्व
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 10:13 AM2021-08-28T10:13:57+5:302021-08-28T10:14:13+5:30
राज्य कार्यकारिणीत पहिल्यांदा दोन तृतीयपंथींचाही समावेश
- अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यावरून राजकीय बैठका सुरू असताना काँग्रेसने जाहीर केलेल्या १९० सदस्यांच्या जम्बो कार्यकारिणीमध्ये ३३ टक्के ओबीसींना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पहिल्यांदा दोन तृतीयपंथींचाही समावेश यात आहे. १७१ पुरुष, १७ महिला आणि २ तृतीयपंथी अशी ही कार्यकारिणी आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये फारसे यश न मिळाल्याने सावध झालेल्या काँग्रेसने सर्व विभागांना कार्यकारिणीत झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वाधिक ३४ सदस्य पश्चिम महाराष्ट्राचे असून त्याखालोखाल ३३ सदस्य नागपूरचे आहेत. या कार्यकारिणीचे सरासरी वय ५२ वर्षे आहे.
3या कार्यकारिणीत जातीनिहाय पाहिल्यास १९० सदस्यांपैकी मराठा समाजाचे ४३ सदस्य आहेत. मुस्लीम समाजाचे २८, ब्राह्मण ११, ओबीसी-कुणबी ११, एससी बुद्ध ११, व्हीजेएनटी धनगर ७, ओबीसी आगरी ६, ओबीसी लिंगायत ६, ओबीसी माळी ५, मारवाडी ४, एससी मातंग ४, व्हीजेएनटी बंजारा ४, ख्रिश्चन ३, ओबीसी - तेली ३, गुजराती २, जैन २, ओबीसी-कलाल २, एससी-महार २, एससी वाल्मीकी २, एसटी - कोकना २, एसटी - कोकणी २, व्हीजेएनटी - राजपूत २, व्हीजेएनटी वंजारी ३ असे प्रतिनिधित्व दिसते.
सर्व समाजाला प्रतिनिधित्व मिळेल आणि विभागवारही समतोल साधला जाईल, याची दक्षता घेण्यात आली आहे. राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या पक्षाने तृतीयपंथींना पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान दिले आहे. तृतीयपंथी व्यक्तीदेखील समाजाचे नेतृत्व करू शकतात हा संदेश काँग्रेस देऊ इच्छिते.
- सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते