ठाणे : मुंबई महापालिकेने रस्ते घोटाळ्यात काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांची कामे ठाण्यातही सुरू आहेत. यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी मागील महासभेत झाली होती. परंतु, अद्यापही त्यांची कामे सुरूच असल्याने सर्वपक्षीय सदस्यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केला. ड्रेनेजलाइनच्या कामाच्या मुद्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची पुन्हा मागणी लावून धरली.महासभा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी त्यांच्या भागातील ड्रेनेजलाइनच्या मुद्याला हात घातला. थोडा जरी पाऊस झाला तरी ड्रेनेजलाइनमधील घाण पाणी हे रहिवाशांच्या घरात शिरत असल्याचा मुद्या त्यांनी उपस्थित केला. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइनची कामे चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच काही ठिकाणी जेथे स्लोप आहे, त्याठिकाणी या वाहिन्यांचा प्रवाह न ठेवता, उलट दिशेने तो काढल्याचेही सदस्यांनी उघड केले. ठाणे महापालिकेचेच या ठेकेदारांनी नुकसान केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या साळवी यांनी केला. >यासंदर्भात सोमवारी आपल्या दालनात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन महापौर संजय मोरे यांनी दिले. या बैठकीनंतरच या ठेकेदारांचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काळ्या यादीतील त्या ठेकेदारांवरून पुन्हा हंगामा
By admin | Published: July 21, 2016 3:46 AM