नवी दिल्ली - 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीसह राज्यात अनेक ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात सैन्यदलाची शक्ती, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचा भव्य प्रदर्शन होईल. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायेर बोलसोनारो हे या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आहेत. उपग्रह छेदणारं शस्त्र 'शक्ती', सैन्याचा लढाऊ रणगाडा भीष्म, युद्धाचे वाहन आणि हवाई दलात अलीकडेच सामील झालेला चिनूक आणि अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्सचा या भव्य सैन्य परेडमध्ये सहभाग असेल.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाची व गर्दीच्या ठिकाणी कडकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी केले आहे. मुंबईसह प्रमुख शहरांतील बसस्थानके, मॉल्सच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून श्वानपथकाद्वारे परिसराची पाहणी केली जात आहे.
- हवाई दलाच्या जाग्वार विमानाची ताकद, ७८० किमी प्रति तास वेगाने शत्रूवर करतं हल्ला
- अपाचे हेलिकॉप्टरचं प्रात्यक्षिक
- चालत्या मोटारसायकलवर उभे राहून हेड कॉन्स्टेबल मीना चौधरी दोन पिस्तूल गोळीबार करण्याचं प्रात्यक्षिक केलं.
- राजपथावर जम्मू काश्मीरचा खेड्याकडे चला थीमवर आधारीत चित्ररथ
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
- अॅडव्हान्सड लाइट हेलिकॉप्टर- वेपन सिस्टम इंटिग्रेटेड रुद्र आणि 2 प्रगत लाइट हेलिकॉप्टर, ‘डायमंड’ मधील आर्मी एव्हिएशनचे ध्रुव निर्मिती केली आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद, ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांचे राजपथावर आगमन, राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे राजपथावर आगमन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात पुष्पहार अर्पण करून प्राण गमावलेल्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. सीडीएस जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल नरवणे, नेव्ही चीफ अॅडमिरल करंबीर सिंह, हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल आरकेएस भदूरिया यावेळी उपस्थित होते.
- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांनी पथसंचलन केलं.
- दिल्ली राजपथावरील संचलन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी
- दिल्लीत भाजपा मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं
- इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) चे जवानांनी लडाखमध्ये १७ हजार फुटांवर राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा केला. याठिकाणी तापमान वजा 20 अंश सेल्सिअस आहे.
नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण. सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी फडकविला तिरंगा
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचे जनरल मॅनेजर संजीव मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.