ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दादर येथील जुनी ऐतिहासिक प्रिटिंग प्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने दादरमध्ये मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दादर पूर्व भागातील काही दुकान बंद करण्यात आली असून, काही दुकानांवर आंदोलकांनी दगडफेकही केल्याचे वृत्त आहे. यामुळे दादर परिसरात तणावाचे वातावरण असून हिंदमाता व दादर भागातील अनेक दुकाने बंद करण्यात आली आहेत, तसेच काही ठिकाणी काचांचा खचही पडला आहे. दरम्यान मोर्चामुळे वाहतूक कोंडीही झाली असून टिळक ब्रीजजवऴही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
स्वत:हा आनंदराज आंबेडकर या मोर्चाचे नेतृत्व करत असून, आंबेडकर भवन ते भोईवाडा पोलिस स्थानकापर्यंत हा मोर्चा काढला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट या ट्रस्टकडे या दोन वास्तूंची मालकी होती. सोमवारी या पाडकामाच्या निषेधार्थ वरळीमध्ये बंद पुकारण्यात आला होता.
आणखी वाचा
ट्रस्टने पुनर्विकासासाठी पाडकाम केल्याचे सांगितले आहे. मात्र त्याला आंबेडकर कुटुंबीय व नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. आंबेडकर कुटुंबीयांकडून आलेल्या तक्रारीनुसार याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर पूर्वेकडील गोकूळदास पास्ता लेन परिसरातील डॉ. आंबेडकर भवन ही इमारत धोकादायक असल्याचे पालिकेने जाहीर केले.
१ जून रोजी याबाबत नोटीसही बजाविण्यात आली. भवनातील सर्व बांधकामे नोटीस प्राप्त होताच ३० दिवसांच्या आत निष्कासित करणे संस्थेला बंधनकारक होते. शनिवारी पहाटे ३च्या सुमारास आंबेडकरी जनतेला थांगपत्ता लागू नये म्हणून या भवनावर बुलडोझर चढविण्यात आला. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री बुलडोझर लावून येथे पाडकाम करण्यात आले.