गटा- तटात विभागला रिपब्लिकन पक्षकाँग्रेससोबत फारकत : आंबेडकरी कार्यकर्ते भाजपच्या तंबूतअमरावती: महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये रिंगणात उमेदवारांची यादी बघितली तर रिपब्लिकन पक्ष हा गटा- तटात विखुरल्याचे दिसून येते. मात्र, काँग्रेसशी परंपरागत मैत्री असलेला रिपब्लिकन पक्ष (गवई गट) स्वबळावर निवडणूक लढवित आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने भाजपशी राज्यात मैत्री केली आहे. मात्र, भाजपसोबत अमरावतीत रिपाइंची मैत्री नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका जाहीर होताच काँग्रेस- राष्ट्रवादी व भाजप- शिवसेना अशी आघाडी, युती होईल, असा राजकीय तज्ञ्जांचा अंदाज होता. परंतु युती, आघाडीत बिघाडी झाल्याने ‘एकला चलो रे’चा नारा देण्यात आला. निवडणुकीत भाजप व काँग्रेसची रिपब्लिकन पक्षासोबत मैत्री होईल, असे संकेत होते. परंतु जागा वाटपाचा तिढा सोडविण्यात काँग्रेस, भाजपच्या नेत्यांना अपयश आले. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने ‘जोर आजमाईस’ म्हणून उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे बसपाने देखील महापालिकेत ३६ उमेदवार रिंगणात आहेत. दलित उमेदवार व्यतिरिक्त अन्य समाजाच्या प्रतिनिधींना तिकिट देवून बसपाने सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केला आहे. यापूर्वी महापालिकेत बसपाचे सहा नगरसेवक होते. तथापि, गुंफाबाई मेश्राम वगळता कोणालाही पुन्हा बसपाने उमेदवारी दिली नाही. तिकिट नाकारल्याने बहुतांश बसपाचे नगरसेवक रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या बॅनरवर निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे बंडखोरीचा फटका बसपाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेत ८७ जागांसाठी ६२४ उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जातीच्या आरक्षित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा जोर आहे. परंतु आरक्षित जागेवर उमेदवारांची संख्या बघता रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार विजयी होणार की नाही? हा चिंतनाचा विषय आहे. रामदास आठवले, राजेंद्र गवई यांचा रिपब्लिकन पक्ष, आ. जोगेंद्र कवाडे यांचा पिपल्स रिपब्लिकन पार्टी तर प्रकाश आंबेडकरांचा भारिप- बमसं आदी रिपब्लिकन पक्ष गटा- तटात विखरून निवडणूक लढवित आहेत. ‘हम किसी से कम नही’ असे म्हणत रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी राजकीय शक्ती पणाला लावली आहे. मात्र महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालानंतर किती यश येईल, हे तेव्हाच स्पष्ट होईल. रिपब्लिकन नेत्यांनी स्वबळावर उमेदवार उभे करुन आपली राजकीय शक्ती तपासून पाहणार आहेत.आंबेडकरी कार्यकर्ते भाजपचे उमेदवार४रिपब्लिकन पक्षात आंबेडकरी विचारधारेवर अनेक वर्षे राजकीय प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपची उमेदवारी घेतली आहे. आंबेडकरी कार्यकर्ते कमळ चिन्हावर निवडणूक लढवित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता दलित वस्त्यांमध्ये रिपब्लिकन पक्षासोबत भाजपचे चिन्ह घराघरात पोहचेल, हे विशेष.
गटा- तटात विभागला रिपब्लिकन पक्ष
By admin | Published: February 16, 2017 1:27 PM