पुणे : महापालिकेला वाहतुकीचे प्रश्न सोडविण्याबाबत विनामोबदला सहकार्य करण्याचा इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अॅन्ड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) या कंपनीने ठेवलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी फेटाळून लावला. विनामोबदला सहकार्य करण्याच्या बदल्यात ती कंपनी देणग्या स्वीकारण्याची शक्यता असल्याने हा प्रस्ताव फेटाळल्याचे स्थायी समितीच्या सदस्यांनी सांगितले. स्थायीच्या या निर्णयानंतर आयुक्त तडकाफडकी बैठकीतून निघून गेल्याचा आरोप स्थायीच्या सदस्यांनी केला.स्थायी समितीच्या बैठकीला मंगळवारी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार उशिरा आले. त्या वेळी आयटीडीपी या कंपनीच्या प्रस्तावाचे सादरीकरण सुरू होते. त्यानंतर मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला असता स्थायीच्या सदस्यांनी तो फेटाळून लावला. ही कंपनी विनामोबदला सेवा का देत आहे, अशी विचारणा नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली. त्या वेळी या करारामुळे कंपनीला देणग्या मिळू शकतील, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय स्थायी समितीकडून घेण्यात आला. त्यानंतर आयुक्त तडकाफडकी बैठकीतून निघून गेले, असा आरोप स्थायी समितीच्या सदस्यांनी केला आहे.बैठकीतून ते निघून गेल्यानंतर एका सदस्याने फोन केला, त्या वेळी आमचे विषय मंजूर होणार नसतील तर स्थायी समितीमध्ये का बसायचे, अशी विचारणा त्यांनी त्या सदस्याला केल्याची माहिती उजेडात आली आहे. नगरसचिवांनी त्यांना फोनवरून विचारणा केली असता वैयक्तिक काम असल्याने बाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्या वेळी आयुक्त हे त्यांच्या कार्यालयातच बसून होते, असे स्थायीच्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त बैठकीतून निघून गेल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. महापालिका आयुक्तांकडून विशिष्ट कंपनीचे विषय मंजूर करण्याचा आग्रह का धरला जातो, अशी विचारणा स्थायीच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे.>वैयक्तिक कारणासाठी अनुपस्थितशहरामध्ये वाहतुकीचे सर्वंकष धोरण ठरविण्यामध्ये इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन डेव्हलपमेंट या कंपनीकडून मदत करण्यात येत आहे. मात्र दुर्दैवाने स्थायी समितीने त्यांच्यासोबतचा विनामोबदला प्रस्ताव फेटाळला आहे. मात्र मी त्या कारणावरून बैठकीबाहेर गेलो नाही तर माझे वैयक्तिक काम असल्याने बाहेर गेलो होतो.- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त
विनामोबदला सहकार्याचा प्रस्ताव फेटाळला
By admin | Published: June 29, 2016 12:56 AM