BJP Devendra Fadnavis ( Marathi News ) : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते आणि पक्षाचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार या महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेलं असल्याने राज्यपालांनी या नेत्यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं असून उद्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपण कालच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी स्वत: सरकारमध्ये सहभागी व्हावं, अशी विनंती केल्याचं सांगितलं आहे.
"किती लोकांचा शपथविधी होणार, याची माहिती सर्वांना सायंकाळपर्यंत दिली जाईल. मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद ही आमच्यासाठी तांत्रिक अॅडजस्टमेंट आहे. महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले आणि यापुढेही तसेच निर्णय घेतले जातील. काल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आपण शिवसेनेच्या वतीने स्वत: मंत्रिमंडळात असावं, अशी विनंती केली आहे. या विनंतीला ते सकारात्मक प्रतिसाद देतील, याची मला खात्री आहे," असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष या महायुतीच्या वतीने आज आम्ही सह्यांचं पत्र देऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. हा दावा स्वीकारून राज्यपालांनी आम्हाला उद्या साडेपाच वाजताची वेळ शपथविधीसाठी नेमूण दिली आहे. मी शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार यांनीही समर्थनाचं पत्र दिलं आहे. आमच्या मित्रपक्षांनीही तशाच प्रकारचं पत्र दिलं आहे. या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपालांना आम्हाला निमंत्रित केलं आहे. उद्या सायंकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होईल," अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, महायुतीत एकत्रितपणे निर्णय घेऊन आम्ही चांगलं सरकार चालवू, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.