- शरद पवार यांची खास ‘लोकमत’शी चर्चा : गांभीर्याने विचार करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन; केंद्र सरकारलाच घालावे लागेल लक्ष- सुरेश भटेवरा / नवी दिल्लीमराठा समाजास नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारलाच सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे, असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी भेटून सांगितले व त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अघ्यक्ष शरद पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पवार म्हणाले की, ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणात मराठा समाजाने कधीही वाटा मागीतलेला नाही. फक्त शैक्षणिक संधीत आणि नोकऱ्यांमधे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे, इतकीच त्यांची मागणी आहे. मराठा समाजातील गरीब कुटुंबांना शैक्षणिक क्षेत्रात सवलती मिळाल्या तर त्याचा थोडाफार भार सरकारी तिजोरीवर पडेल. त्यांनी असेही सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे तर तो निर्णय अर्थातच राज्यस्तरावर होणार नाही. घटनादुरूस्तीशी संबंधित हा विषय असल्याने केंद्र सरकारलाच त्यात लक्ष घालावे लागेल. संसदेत या विषयाची चर्चा घडवण्यापूर्वी सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेतल्यास उचित मार्ग काढता येईल, असे मी पंतप्रधानांच्या कानावर घातले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येत, शिस्तीत व शांततेत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चांचे नेतृत्व कोणाकडेही नव्हते, त्यामुळे त्याला कोणताही राजकीय रंग चढवणे उचित नाही, असे करून पवार म्हणाले, वर्षानुवर्षे तोट्याची जिरायत शेती करणाऱ्या बहुसंख्य ग्रामीण शेतकरी कुटुंबाची अस्वस्थता या मोर्चातून व्यक्त झाली आहे. त्यामागची त्यांची भावना समजावून घेणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे समर्थन करताना पवार म्हणाले की, राज्यात सुमारे दोन कोटींची लोकसंख्या गरीब मराठा समाजाची राजकीय क्षेत्रातील मराठा समाजाच्या नेत्यांशी अथवा सधन मराठा कुटुंबांशी तुलना करणे योग्य नाही. मराठा समाजातीला बराच मोठा वर्ग ग्रामीण भागात निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीवर कशीबशी गुजराण करतो आहे. राज्यक र्ते कोणत्याही पक्षाचे असले तरीत्यांना त्यांच्या अस्वस्थतेची दखल घ्यावीच लागणार आहे.
मराठा आरक्षणातून सर्वपक्षीय मार्ग काढण्याची मोदींना विनंती
By admin | Published: October 14, 2016 1:44 AM