पुणे : लोकसंख्येचे मनुष्यबळात परिवर्तन करण्याबरोबरच संशोधनाचे पाठबळ असलेली उच्चशिक्षण व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी व्यक्त केले. लोकसंख्या आणि शिक्षण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टींचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतो, यावर देशाचा विकास अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पहिला ‘श्रीमंत राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ राज्यपाल राव यांच्या हस्ते दिल्ली येथील एकल विद्यालय फाउंडेशनचे अध्यक्ष बजरंग बागडा यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून शिक्षणामुळे विकासाची दारे खुली होतात. त्यासाठी कौशल्य देणारे आणि संशोधनावर भर देणारी शिक्षणप्रणाली कशी विकसित करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, युवकांची सर्वाधिक संख्या देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. २०२०मध्ये भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय २९ वर्ष असेल. हे वयचीन आणि अमेरिकेच्या तुलनेत आठ वर्षाने कमी असेल. युवाशक्ती हीच खरी देशाची ताकद असून, युवकांनी विविध कल्पना साकार करून समाजोपयोगी संशोधन करायला हवे. (प्रतिनिधी)राज्यातील काही शाळांमध्ये २ ते ३ विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली असून, काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे लवकरच याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. - सी. विद्यासागर राव, राज्यपाल
संशोधनाचे पाठबळ असलेली शिक्षण व्यवस्था विकसित व्हावी!
By admin | Published: January 03, 2016 2:37 AM