पिंपरी (पुणे) : देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी संशोधन संस्थांचा सहभाग गरजेचा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवतेचा स्वीकार करून परवडणारी, सहज उपलब्ध होणारी आणि सुरक्षित, प्रदूषणमुक्त वाहतूक सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. रस्ता वाहतुकीसंदर्भात संशोधन करणाºया संस्थांनी लंडनमधील सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभ्यास करून यात बदल घडवून आणावेत, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.पिंपरी-चिंचवडमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट संस्थेच्या (सीआयआरटी) सुवर्णमहोत्सवी समारंभानिमित्त आयोजित सुरक्षित आणि शाश्वत वाहतूक या विषयावरील राष्टÑीय परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नितीन काळजे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, एपीएसआरटीसीचे उपाध्यक्ष डॉ. एम. मलकोंडी,आदी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, ‘‘आज राज्य परिवहन संस्थांसाठी कठीण कालखंड असून नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक वाहतूक सेवेत बदल घडवून आणण्याची गरज आहे. देशातील राष्टÑीय महामार्गांचे प्रमाण दोन टक्के आहे. एकूण रस्त्यांपैकी या महामार्गावर ४० टक्के वाहतूक असते. वर्षाला पाच लाख अपघात होतात. त्यामध्ये दीड लाख जणांचा मृत्यू होतो. माझ्याकडे पदभार आल्यानंतर सुरुवातीला दोन वर्षे अपघातांचे प्रमाण कमी झालेले नव्हते. मात्र, वर्षभरात हे प्रमाण चार टक्क्यांनी कमी झाले आहे. रोड इंजिनिअरिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी बारा हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अशीच मोहीम जिल्हा, पंचायत समिती आणि महापालिका पातळीवर राबवावी. रस्ता सुरक्षा समिती नेमावी.’’
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत संशोधन संस्थांचा सहभाग गरजेचा :नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 4:11 AM