ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - ‘नमस्कार, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे, सकाळचे सात वाजून दहा मिनिटे झाली आहेत’,अशी सुरुवात होऊन प्रादेशिक बातम्या ऐकणा-यांची आता निराशा होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे मंगळवारी प्रसिध्द करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोट्यवधी लोकांच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या बातम्यांचा ‘आवाज’ बंद होणार असल्याने आकाशवाणीतील वृत्त निवेदकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी वृत्त निवेदकांकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. खासदार अनिल शिरोळे यांच्याशी बोलणे झाल्यानंतर शिरोळे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैैंकय्या नायडू यांना पत्र पाठवले आहे. तसेच, या निर्णयाबाबत टिवट करुन पुणेकरांनीही आपली मते नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
टीव्ही चॅनल, सोशल मिडीया आणि मोबाईलच्या जमान्यातही महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांची नाळ आकाशवाणीशी जोडली गेली आहे. सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणा-या बातम्या ऐकल्याशिवाय त्यांचा दिवस सुरु होत नाही. हे बातमीपत्र बंद करण्यााचा निर्णय चुकीचा आणि दुर्देवी असल्याचे वृत्त निवेदकांचे म्हणणे आहे. अध्यादेशानुसार पुणे केंद्रातील उपमुख्य संचालक पद कोलकाता तर वृत्त संपादक पद श्रीनगर केंद्रात हलवण्यात आले आहे. पुण्यातील वृत्तविभागामध्ये कोणतेही नवीन पद भरण्यात आलेले नाही, त्यामुळे वृत्तविभाग कोणाच्या भरवशावर चालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वृत्त निवेदक स्वाती महाळंक म्हणाल्या, ‘पुणे आकाशवाणी केंद्राबाबत घेण्यात आलेला हा निर्णय एकतर्फी आहे. यामुळे हंगामी वृत्त निवेदकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहेच; परंतु, हा कोट्यवधी श्रोत्यांवर होणारा अन्याय आहे. पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये अद्ययावत सोयीसुविधा, यंत्रणा उपलब्ध आहे. राज्यभरात मुंबईपाठोपाठ पुण्याची प्रसारणक्षमता सर्वाधिक आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला केंद्रांचे विलिनीकरण करायचे असेल तर औैरंगाबादमधील केंद्र पुण्यामध्ये विलीन करता आले असते. पुण्याहून प्रसारित होणा-या बातम्या दहा मिनिटांऐवजी पंधरा मिनिटांच्या करुन मराठवाड्यातील घडामोडींनाही न्याय देता आला असता. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली चुकीचा निर्णय घेणा-या व्यक्तींना आकाशवाणीतील कामाचे महत्व, अनुभव याबाबत किती माहिती आहे, याबाबतही साशंकताच आहे. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी वैैयक्तिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याबाबत मी खासदार अनिल शिरोळे यांना भेटले. शिरोळे यांनी याबाबत वैंकय्या नायडूंना पत्र लिहिले असून याबाबत टिवटही केले आहे. पुणेकरांनी याबाबत मते नोंदवण्याचे आवाहनही केले आहे.
अविनाश पायगुडे म्हणाले, ‘पुण्याला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. केंद्र सरकारच्या अनेक महत्वाच्या संस्था पुण्यात आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा चार केंद्रांतून प्रादेशिक बातम्या देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. बातम्यांच्या माध्यमातून बारीकसारीक घटनांची नोंद लोकांपर्यंत पोचते. बातमीच्या तपशीलात लहानशी त्रुटी असेल तरी लोकांचे तातडीने फोन येतात. त्यांची आकाशवाणीशी अनेक वर्षांपासून घट्ट नाळ जुळलेली आहे. पुणे केंद्राला प्रत्यक्षात दोन पूर्ण वेळ वृत्त निवेदक देणे गरजेचे असताना सध्या एकच वृत्तनिवेदक आहे. आता, सध्या असलेली पदे काढून घेणे हा निव्वळ अविचारीपणा आहे. हंगामी वृत्त निवेदकांच्या रोजगारावरही या निर्णयामुळे गदा येणार आहे. त्यामुळे प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मागे घेणे आवश्यक आहे.
सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘पूर्वीच्या काळी टीव्हीचे पेव फुटलेले नसताता गावातील लोक चावडीवर बसून ७.१० च्या बातम्या भक्तीपूर्वक ऐकत असत. गावात वर्तमानपत्रही उशिरा येत असल्याने आजूबाजूच्या घडामोडींची माहिती मिळण्याचे आकाशवाणी हे एकमेव माध्यम होते. आता सर्व माध्यमांचा मारा होत असतानाही लोकांची आकाशवाणीवरील श्रध्दा यत्किंचितही कमी झालेली नाही. लोकांच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या ७ वाजून १० मिनिटांच्या बातम्या बंद झाल्यास कोट्यवधी लोकांना चुकल्याचुकल्यासारखे वाटेल. त्यामुळे, हा निर्णय मागे घेण्यात यावा, असे माझे मत आहे.
पुणे विभागामध्ये सध्या २ कायमस्वरुपी पदे आणि ३३ कॉन्ट्रॅक्टवरील पदे आहेत. त्यापैकी ८ बातमीदार तर इतर २५ कर्मचारी आहेत. २ कायमस्वरुपी पदापैकी वृत्तसंपादकांचे एक पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे, उर्वरित एक पद श्रीनगर येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील वृत्तविभागामध्ये प्रमुख जबाबदार पद राहिलेले नाही. आठ बातमीदार महिन्यातून केवळ सहा दिवस काम करत होते. त्यांचे एक दिवसाचे कॉन्ट्रॅकट महिन्यातून सहा वेळा केले जात होते, त्यांचे भवितव्यही आता अधांतरी आहे.
यासंदर्भात आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आकाशवाणीहून सकाळी देण्यात येणा-या बातम्या या सर्वाधिक लोकप्रिय होत्या. एक कोटींपेक्षा अधिक लोक बातम्या ऐकत होते. केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशनुसार वृत्त विभागातील महत्वाची दोन पदे श्रीनगर आणि कोलकाता येथे हलवण्यात आली आहेत, तर नवीन कोणतेही पद येथे भरण्याची तरतूद नाही मग वृत्तविभागाचे काम चालणार कसे. बातम्यांच्या संदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही, परंतु वृत्त विभागच बंद झाला तर बातम्या देणार कुठून असा सवालही अधिका-याने केला.