नाना पटोलेंविरोधात नाराजी?; काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 07:01 AM2022-04-30T07:01:21+5:302022-04-30T09:18:52+5:30
प्रभारी एच. के. पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी राज्यातील पक्षाच्या संघटनात्मक बदलावर प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.
विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरातही येथे सकाळी दाखल झाले होते. थोरात यांनी सकाळी एच. के. पाटील यांची भेट घेतली. एच. के. पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाचे संकेत मिळाले आहेत. राज्यातील डिजिटल सदस्यता मोहिमेचा आढावा तसेच संघटनात्मक बाबींवर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचे समजते. एच. के. पाटील व सोनिया गांधी यांच्या भेटीच्यावेळी बाळासाहेब थोरात मात्र सोबत नव्हते.
राज ठाकरे ‘ड्युप्लिकेट’ नेते : बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज ठाकरे राज्यातील ‘डुप्लिकेट’ नेते असून, ते भाजपचा अजेंडा राबवीत असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी थोरात येथे आले आहेत. थोरात म्हणाले, ‘राज ठाकरे यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते भूमिका बदलतात. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते मोदी सरकारवर टीका करीत होते. आता त्यांना महागाई, बेरोजगारीचे प्रश्न दिसत नाहीत. ठाकरे आता भोंगा व हनुमान चालिसावर बोलतात. ते आता भाजपशी संधान बांधून आहेत. भाजपचा अजेंडा ते महाराष्ट्रात राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भूमिका बदलणाऱ्या नेत्यांना किती गांभीर्याने घ्यायचे, असेही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेणे शक्य होणार नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळण्यात येतील, असे थोरात म्हणाले.
पटोलेंबद्दल नाराजी?
महाराष्ट्रातील काही आमदारांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी आहे. ही नाराजी काही आमदारांनी उघड केली आहे. या नाराजीबद्दल तसेच राज्यातील पक्षाच्या संघटनात्मक रचना अधिक बळकट करण्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.