मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; दिल्लीत महत्वपूर्ण बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 02:56 PM2019-12-31T14:56:39+5:302019-12-31T14:56:48+5:30
निवडणुकीपूर्वी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली असून, पक्षनिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे, असा सूर काँग्रेस नेते आळवू लागले आहेत.
मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. यात एकूण 43 मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. तर काँग्रेस पक्षातील 8 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची तर 2 आमदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र असे असताना सुद्धा काँग्रेस पक्षात मोठ्याप्रमाणावर नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा सुद्धा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
यात माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांच्यासह संग्राम थोपटे, अमीन पटेल, रोहिदास पाटील यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील काही नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निवडणुकीपूर्वी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली असून, पक्षनिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे, असा सूर काँग्रेस नेते आळवू लागले आहेत.
आज दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची सोनिया गांधी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक आहे. या बैठकीत नाराज असलेल्या आमदारांच्या मुद्यावरून चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रणिती शिंदे यांचे नाव शेवटपर्यंत आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत त्यांचा नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे त्या सुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा मंत्रीपदावर वर्णी न लागल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ या आमदारांची नाराजी कशी दूरू करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.