ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.07 - नागपूर महापालिकेच्या ३८ प्रभागातून १५१ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. यात महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने प्रत्येक प्रभागात दोन महिला व प्रवर्गनिहाय राखीव जागांची सोडत शुक्रवारी सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात काढण्यात आली. यात महापौर, उपमहापौर व विरोधी पक्षनेते यांच्यासह महापालिकेतील मातब्बरांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महिलांसाठी ७६ जागा आरक्षित आहेत. खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी ३४, अनुसूचित जातीसाठी ३०, अनुसूचित जमातीसाठी १२ तर इतर मागासवर्गीयांसाठी ४७ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. यातील अनुसूचित जाती महिलांसाठी १५, अनुसूचित जमाती महिलांसाठी ६ तर मागास प्रवर्गातील महिलांसाठीच्या २१ जागांची सोडत काढण्यात आली. उर्वरित ३४ जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते. नवीन प्रभाग रचना व आरक्षण सोडतीत काय घडणार याची उत्सुकता शहरातील नागरिकांना लागली होती. महापौर प्रवीण दटके, उपमहापौर सतीश होले, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊ त, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, महिला व बालकल्याण सभापती रश्मी फडणवीस, अपक्ष नगरसेवक परिणय फुके, यांच्यासह महापालिकेतील मातब्बरांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गासाठी राखीव तसेच खुल्या प्रवर्गासाठीच्या जागांचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर उतरत्या क्रमानुसार राखीव जागांची सोडत काढण्यात आली. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ इतकी आहे. यात अनुसूचित जाती ४ लाख ८० हजार ७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १ लाख ८८ हजार ४४४ इतकी आहे. नागपूर शहराची लोकसंख्या व महापालिकेचे १५१ प्रभाग विचारात घेता प्रत्येक प्रभागात सरासरी ६४८३४ मतदार राहणार असल्याचे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
नागपूर महापालिकेच्या प्रभागातील आरक्षण जाहीर
By admin | Published: October 07, 2016 7:27 PM