‘आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर आणि ओबीसींना फसवले’ नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 04:02 PM2023-10-27T16:02:52+5:302023-10-27T16:05:48+5:30
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला अधिकार नसताना विधानसभेत आरक्षणाचा कायदा केला आणि समाजाची फसवून केली. आज आरक्षणाचा प्रश्न जो चिघळला आहे त्याला भाजापच जबाबदार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आंदोलन, आरक्षणासाठी धनगर समाजाने सुरू केलेलं आंदोलन यामुळे सध्या महाराष्ट्रातलं सामजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला असून, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा, धनगर आणि ओबीसी समाजाला फसवले, असा आरोप पटोले यांनी केला आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात आज आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालेला आहे. आजच्या या परिस्थितीला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. २०१४ मध्ये भाजपाने जे विष पेरले त्याचीच विषवल्ली आज पसरलेली दिसत आहे. भाजपाने मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आणि राज्यात व केंद्रात सरकार आले तरी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला नाही. काँग्रेस आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते, त्यासाठी नारायण राणे समितीही नेमली होती पण नंतर आलेल्या भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच राज्यात आजची परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप पटोले यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने २०१८ मध्ये घटनादुरुस्ती करुन राज्याचे आरक्षणाचे अधिकार काढून घेतले. पण देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला अधिकार नसताना विधानसभेत आरक्षणाचा कायदा केला आणि समाजाची फसवून केली. आज आरक्षणाचा प्रश्न जो चिघळला आहे त्याला भाजापच जबाबदार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.