बीड : राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षण असावे, असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे खच्चीकरण झाले आणि या समाजास आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेस खीळ बसणार आहे. सध्या विविध समाजास मिळणा-या आरक्षणाच्या बाबतीतही पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केली.सध्या अनेक राज्यांत आरक्षणाची चळवळ चालू आहे. ओबीसी समाजात समावेश करावा, या मागणीसाठी महाराष्ट्रात मराठा समाजाने भव्य मोर्चे काढले. हरियाणात जाट समाजाचे, गुजरातमध्ये पटेल, आंध्र प्रदेशात काटोल, तसेच महाराष्ट्रात धनगर आणि मुस्लिमांनी आरक्षणासाठी आंदोलन केले.अशा स्थितीत पवार यांनी केलेले वक्तव्य हे मराठा समाजावर अन्याय करणारे आहे. देशाचे, राज्याचे नेते म्हणून पवार यांच्याबद्दल आदर आहे. त्यांची सामाजिक भूमिकाही सर्वमान्य आहे; परंतु आपल्या या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला खीळ बसत आहे, याची आपणास जाणीव आहे का, असा सवालही आ. मेटे यांनी शरद पवार यांना केला.ओबीसीत समावेश व्हावा म्हणून मराठा समाज संघर्ष करीत आहे. या प्रश्नी राज्यभर महामोर्चे काढले. तेव्हा शरद पवार गप्प होते. आघाडी सरकार असतानाही त्यांनी मौन बाळगले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला मोठे अपयश आले, तेव्हा आघाडी सरकारने घाईघाईत मराठा आणि मुस्लिम समाजास आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही पवार यांनी ठोस भूमिका घेतली नाही किंवा आपले मत व्यक्त केले नाही. नेमकी आताच अशी भूमिका घेण्याचे कारण काय, असे ते म्हणाले. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास विरोध आहे काय, आता जे विविध घटकांना आरक्षण मिळते त्यास विरोध आहे काय? हे पवारांनी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे. ते ओबीसीतच हवे आहेत. आताच्या आरक्षणाला धक्का न पोहोचता मराठा समाज आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करतो आहे. समाजाचा हा रेटा लक्षात घेऊन विद्यमान सरकार हे मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी काही निर्णय घेण्याच्या प्रयत्नात असतानाच पवारांनी असे वक्तव्य करून त्यास फाटे फोडू नयेत, असे ते म्हणाले. राज्य मागासवर्गीय आयोग या आरक्षणाच्या बाबतीत विचार करीत असताना आणि आरक्षणाच्या मुद्यावर खंडपीठात सुनावणी चालू असताना आर्थिक निकषाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार यांनी एक प्रकारे मराठा समाजाचे नुकसानच केले आहे. समाजाचे नुकसान व्हावे, अशी भूमिका पवार यांनी घेऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विविध राज्यांत आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलने सुरू आहेत. या सर्व राज्यांतील आंदोलनकर्त्या नेते मंडळींची २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. या बैठकीसाठी मी उपस्थित राहणार आहे, असेही आ. मेटे यांनी सांगितले.
पवारांच्या विधानानं मराठा समाजाच्या आरक्षणाला खीळ बसणार- विनायक मेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 8:13 PM