छत्रपती संभाजीनगर : समाजा-समाजात दुही माजेल, असे वर्तन कुणी करू नये. जातीनिहाय जनगणना करून, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या-त्या समाजाला आरक्षण द्यावे, ही काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.
मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण होता कामा नये, असे बजावत पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ सत्ताधारी उठवू इच्छित असतील तर त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत. कारण, त्यांनी सर्वांनाच आरक्षण देतो, अशा थापा मारून सत्ता हाती घेतली आणि ते कुणालाच आरक्षण देऊ शकत नाहीत, हे आता जनतेलाही समजले आहे.
तुम्ही मुख्यमंत्री होणार का? तुम्ही मुख्यमंत्री होणार का, या थेट प्रश्नाला उत्तर देताना अशोक चव्हाण उद्गारले, हा अवघड प्रश्न आहे. मी काही सांगू शकणार नाही. (बाजूलाच बसलेल्या नाना पटोलेंकडे पाहत) अध्यक्ष सांगू शकतील. नानाभाऊंच्या मागे आम्ही भक्कमपणे आहोत. पटोले म्हणाले, सध्या भाजपला हद्दपार करणे, हा आमचा हेतू आहे. मुख्यमंत्री कुणाला करायचे, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात.