ठाणे : महाराष्ट्रात जातीचे विषय कालवण्याचा उद्योग सुरू आहे. पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून त्यासाठी जातीच्या आधारावरील मोर्चांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा जातींच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात केली. पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेलाही त्यांनी फटकारले. शिवसेनेने आधी आरक्षणप्रश्नी भूमिका जाहीर करायला हवी आणि नंतरच विशेष अधिवेशनाची मागणी करायला हवी, अशा शब्दांत त्यांनी सेनेला टोलवले.राज्यातील नव्हे, तर देशातील शिस्तबद्ध मोर्चे असे मराठा मोर्चाचे वर्णन त्यांनी केले. त्याचवेळी त्यांनी जातीच्या आधारावर आरक्षणाला विरोध केला. ब्राह्मण मुख्यमंत्री असतानाच यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा का काढावासा वाटला, असा प्रश्न करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू उचलून धरत ते म्हणाले, शरद पवार आता म्हणताहेत आरक्षण द्या. पण त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना आरक्षण देण्यापासून कोणी रोखले होते? या लोकांना समाजाशी देणे-देणे नाही. समाजाचा वापर निवडणुकांसाठी कसा करायचा इतके कळते. आरक्षण देण्यातील अडचणी त्यांना ठावूक आहेत, तरीही ते या मुद्द्यावरून वातावरण तापवत असल्याबद्दल त्यांनी टीकास्त्र सोडले.पाकिस्तानमधील सर्जिकल अॅटॅकसंदर्भात सर्व पक्ष एकासुरात बोलत असल्याचे कौतुक करून त्यांनी पाक कलाकारांच्या मुद्द्यावरून मित्र असलेल्या सलमान खानला फटकारले. देशासमोर व महाराष्ट्रासमोर कोणी माझा मित्र नाही. त्याने जपून बोलायला हवे होते, याचा पुनरूच्चार त्यांनी केला. कलाकाराला सीमेचे बंधन नसल्याचे मत मांडणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. सीमेवरच्या जवानाचे पाकिस्तानशी वैयक्तिक भांडण नाही. तो तेथे लढतो म्हणून आपण येथे सुखात जगतो, याची जाणिव त्यांनी करून दिली. (प्रतिनिधी)>सर्वाधिक परप्रांतीय ठाणे जिल्ह्यातठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. परप्रांतीय आल्याने लोकसंख्या वाढली आणि नगरपालिकांच्या महापालिका झाल्या. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक परप्रांतीय असल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केला.
निवडणुकांसाठी आरक्षण मोर्चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2016 3:54 AM