मुंबई : सायन रुग्णालयात सुरक्षा रक्षक नसल्याने एका निवासी डॉक्टरला रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी मिळून शनिवारी मारहाण केली. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा सरकारसमोर यावा, म्हणून सोमवारी सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर एक दिवसाचा मास बंक करणार आहेत. तर, राज्यातील साडेचार हजार निवासी डॉक्टर निषेध नोंदवण्यासाठी काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. शनिवारी दुपारी सायन रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७मधील रुग्ण अरीफ नझीम आणि त्याचा नातेवाईक अहमद इकरार या दोघांनी मिळून निवासी डॉक्टर रमेश राठोड याला मारहाण केली. या मारहाणीच्या वेळी तिथे सुरक्षा रक्षक नव्हता. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांवर डॉक्टर संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. तरीही डॉक्टरांना सुरक्षा द्या, ही मार्डची मागणी पूर्ण झालेली नाही. ही बाब सरकारच्या, रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सायन रुग्णालयात एक दिवसाचा मास बंक करण्यात येणार आहे. आपत्कालीन विभागात आरोग्य सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. या मास बंकमुळे आरोग्य सेवेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे मध्यवर्ती मार्ड संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
निवासी डॉक्टरांचा ‘मास बंक’
By admin | Published: April 20, 2015 2:45 AM