वसई : रेल्वे स्टेशनवर दिवस काढल्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास विरार आणि नालासोपारा परिसरातील चाळी आणि झोपडपट्टींमध्ये घुसून मोबाइल आणि इतर किमती वस्तू चोरणाऱ्या एका महिलेला रानेळे तलाव येथील पहारा करणाऱ्या लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. तिच्याकडून शंभरहून अधिक मोबाइल आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.गेल्या महिनाभरात एका चोरट्या महिलेने विरारमधील कारगील नगर, रानेळे तलाव आणि नालासोपारा येथील संतोष भवन येथील चाळी आणि झोपडपट्टीत धुमाकूळ घातला होता. मध्यरात्री अडीचनंतर ही महिला आपल्या साथीदारांसह चोऱ्या करायला बाहेर पडत असे. बंद घरात घुसून ही महिला मोबाइल आणि घरातील इतर वस्तू लंपास करत होती.गेल्या पंधरा दिवसात या महिलेने विरार येथील रानेळे तलाव परिसरात असलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घातला होता. चोरटी महिला असल्याचे लोकांचे म्हणणे होते. पण, चोऱ्या करून ती सहीसलामत गायब होत असल्याने त्यामुळे येथील लोक हैराण झाले होते. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने रानेळे तलाव येथील लोकांनी रात्रीचा पहारा सुरु केला होता. महिला आणि पुरुष काठ्या, सळया घेऊन पहारा देत होते. पण, पंधरा दिवस झाले तरी ती हाती लागत नव्हती. अखेर रविवारी पहाटे ही महिला येथील लोकांच्या हाती लागली. लोकांनी तिला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर तेथील मंदिरात बांधून ठेवून पोलिसांच्या हवाली केले. (प्रतिनिधी)
जागता पहारा देत रहिवाशांनी चोराला पकडले
By admin | Published: April 17, 2017 3:16 AM