नवी मुंबई : महापालिकेने सुरू केलेल्या कारवाई विरोधात झोपडपट्टीमधील रहिवाशांनी एल्गार पुकारला आहे. तुर्भे स्टोअर्समधील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर इंदिरानगरमधील रहिवाशांनीही लढ्याची तयारी सुरू केली आहे. सुविधा पुरविण्याऐवजी घरांवर कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यात आला व कारवाई थांबविली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. इंदिरानगरमधील रहिवाशांनी पालिकेच्या कारवाईविरोधात रविवारी बैठकीचे आयोजन केले होते. समाजमंदिराच्या बाहेर जमलेल्या नागरिकांनी पालिकेच्या कारवाईचा निषेध केला. झोपडपट्टी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गरीब नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देण्याऐवजी त्यांच्या घरांवर नांगर फिरविण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवसेना नगरसेवक महेश कोठीवाले, तुर्भे स्टोअर्समधील विनोद मुके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महापालिकेच्या अस्तित्वापूर्वी येथील वसाहती उभ्या राहिल्या आहेत. दहा बाय दहाच्या घरात तीस ते चाळीस वर्षे अनेकजण वास्तव्य करत आहेत. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने गरजेपोटी आहे त्या घरामध्ये पोटमाळा काढण्यात आला आहे. हे अतिक्रमण नसून घरातील सदस्यांना राहण्यासाठी पुरेसी जागा मिळावी एवढीच अपेक्षा आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेण्याऐवजी त्यांच्या घरांवर कारवाई करणे योग्य नाही. पोटमाळ्यावर जाण्यासाठी बसविण्यात आलेल्या शिड्याही काढण्यात आल्या असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यादवनगरमध्ये वॉक विथ कमीशनरचे आयोजन केले व दुसऱ्या दिवसापासून तेथील बांधकामांवर कारवाई सुरू केली. यानंतर तुर्भे स्टोअर्समध्ये हा उपक्रम राबविण्यात आला व आयुक्तांनी पाठ फिरविताच पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली. यामुळे यापुढे आयुक्त जिथे जातील तिथे कारवाई सुरू होणार अशी भीती रहिवाशांना वाटू लागली आहे. पालिकेच्या कारवाईमध्ये अतिक्रमण हटविण्याऐवजी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. गरिबांवर कारवाई करून प्रशासनाला काय मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. >आम्ही काय गुन्हा केलाझोपडपट्टीमधील रहिवासी आम्ही काय गुन्हा केला? असा प्रश्न मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना उद्देशून विचारत आहेत. तुर्भे नाक्यावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या लॉजची तक्रार करूनही कारवाई केली जात नाही; पण गरिबांच्या घरांवर मात्र कारवाई होत नाही. साहेब आमच्या घरांवर नांगर फिरवू नका, असे आवाहनही करण्यात येत आहे. तुर्भे स्टोअर्सवासीही एकवटलेपालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधात तुर्भे स्टोअर्समध्ये नगरसेवक सुरेश कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी, राधा कुलकर्णी, राजू शिंदे, संतोष जाधव यांनी लढा उभारला आहे. डोक्यावरील छत वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्यास सुरुवात केली असून गरिबांना त्यांच्या हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित ठेवले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इंदिरानगरवासीही आता एकवटू लागल्याने भविष्यात सर्वच झोपडपट्टीमधील रहिवासी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. >महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. राज्य शासन २०१५ पर्यंतची बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन देत असताना पालिका गरिबांची घरे पाडत असून या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल. - महेश कोठीवाले, शाखाप्रमुख, शिवसेना
घर वाचविण्यासाठी रहिवाशांचा एल्गार
By admin | Published: February 27, 2017 2:26 AM