लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाचे आगमन लांबल्याने गरमीने नागरिक त्रस्त असतानाच घणसोली व कोपरखैरणे परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे वीज वितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, तर ऐन गरमीत रात्री-अपरात्री वीज जात असल्यामुळे अनेकांना उघड्यावर रात्र काढावी लागत आहे.नवी मुंबईत वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडत आहे. उघड्या विद्युत डीपी, उघड्यावर पडलेल्या विद्युत वायर यामुळे अनेक अपघात घडत आहेत. यासंबंधी नागरिकांनी तक्रार देवून देखील वीज वितरण कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याचे उघड चित्र शहरात पहायला मिळत आहे. अशातच ऐन गरमीच्या दिवसात वितरणच्या भोंगळ कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून घणसोली व कोपरखैरणेत विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री तासन्तास वीज जात असल्यामुळे त्याठिकाणच्या नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे संतप्त रहिवासी वीज वितरणच्या कार्यालयावर देखील धडक देत आहेत. अशावेळी नागरिकांचा संताप अनावर झाल्यास गैरप्रकार देखील घडण्याची शक्यता आहे. कोपरखैरणे गाव, सेक्टर १७, १८ व १९ या परिसरात सर्वाधिक विजेचा लपंडाव होत आहे. सोमवारी रात्री देखील या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने या परिसराची वीज गेल्याचे वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गेलेली वीज मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांची सुमारे १५ ते १८ तास विजेविना प्रचंड गैरसोय झाली.
कोपरखैरणेत विजेच्या लपंडावाने रहिवासी त्रस्त
By admin | Published: June 07, 2017 2:51 AM