मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 19:31 IST2024-10-22T19:18:58+5:302024-10-22T19:31:30+5:30
समीर भुजबळ यांच्याकडून नांदगावमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असून प्रसंगी ते बंडखोरी करण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जातं.

मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
NCP Sameer Bhujbal ( Marathi News ) :नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असणाऱ्या समीर भुजबळ यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज झाल्याची माहिती आहे. समीर भुजबळ हे बंडखोरी करून निवडणूक लढवणार असल्यास त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
समीर भुजबळ हे ज्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तो मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघातून सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत. तसंच कांदे यांनी आपण कोणत्याही स्थितीत याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात येऊ शकते. असं असताना समीर भुजबळ यांच्याकडूनही नांदगावमधून लढण्याची तयारी सुरू असून प्रसंगी ते बंडखोरी करण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी समीर भुजबळ यांना मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपदावरून दूर करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
दरम्यान, याबाबत समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता मला अद्याप सुनील तटकरे अथवा अजित पवार यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी विचारणा केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे नांदगाव विधानसभेत आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.