Ajit Pawar Ramraje naik nimbalkar News: "रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हातात सूत्रं दिली. त्यांचा मानसन्मान ठेवला. भाजपची मते घेतली आणि रामराजेंना सभापती केलं. महत्त्वाची खाती दिली. रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे यांचं का पटले नाही माहिती नाही", असे म्हणत अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (महायुती) उमेदवार सचिन कांबळे यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा झाली. साखरवाडीत झालेल्या या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकेची तोफ डागली.
अरे मग तुम्ही काय करता? अजित पवारांचा सवाल "आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगत होते की, श्रीराम सहकारी साखर कारखाना, नाव श्रीरामाचं आणि दिलाय चालवायला. अरे कारखाना काढल्यानंतर सात वर्षात कारखान्याचे रिपेमेंट (परतफेड) आम्ही करतो आणि कर्जमुक्त करतो. तुम्ही २५-३० वर्षे चालवायला. अख्खी पिढी... अरे मग तुम्ही काय करता? तुमच्या धमक आणि ताकद नाही?", असा सवाल करत अजित पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना लक्ष्य केले.
धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या -अजित पवार
अजित पवार पुढे म्हणाले, "श्रीमंत राजे, तुम्ही उघड उघड त्या दीपकच्या प्रचाराला जावा. मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता. तुम्ही आता तिकडे गेला ना, त्या आमदारकीला लाथ मारा. तुमच्यात खरंच धमक आणि ताकद असेल ना, तुम्ही आमदारकीला लाथ मारून तिकडे (शरद पवारांकडे) जावा, मला काही वाटणार नाही", असे म्हणत अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना आव्हान दिले.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर
अजित पवारांनी दीपक चव्हाण यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. पण, त्यानंतर अजित पवारांना धक्का बसला. दीपक चव्हाण शरद पवारांकडे गेले आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. दीपक चव्हाण यांचं काम रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून करत असल्याची चर्चा आहे. त्यावरूनच अजित पवारांनी संताप व्यक्त केला.