लोकमत न्यूज नेटवर्कनातेपुते (जि. सोलापूर) : मारकडवाडी येथे ईव्हीएमच्या विरोधात भाषणे करून लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारे नेते आणि त्यांच्या घरातील, पक्षातील आमदार, खासदारांनी आधी राजीनामा द्यावा, मगच ईव्हीएमच्या विरोधात बोलावे, असे आव्हान आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले.
मारकडवाडी (ता. माळशिरस) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते. पडळकर म्हणाले, ईव्हीएम हॅक केले ते लाडक्या बहिणी, कष्टकरी शेतकरी, शोषित जनतने आणि ओबीसी मतदारांनी. जनतेनेच ईव्हीएम हॅक करून महायुतीच्या पारड्यात मतांचे दान टाकले. हे आंदोलन मोहिते पाटील व त्यांच्या नेत्यांनी सुरू केले असून, लोकांनी नेहमीच गुलामीत राहावे, असे त्यांना वाटते. यातूनच ईव्हीएमला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे.
राजीनाम्यास तयार ‘बॅलेट’वर मतदानाचे पत्र घ्या : पटोलेसत्ताधाऱ्यांनी बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याचे पत्र निवडणूक आयोगाकडून घ्यावे. माझ्यासहीत येथील आमदार उत्तम जानकर आणि खूप जण राजीनामे देण्यास तयार आहोत, असे प्रतिआव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.मंगळवारी पटोले यांनी मारकडवाडीला भेट देऊन ग्रामस्थांनी संवाद साधला. आपल्या मारकडवाडीची माती राहुलजींच्या हाताने बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या चरणी वाहिली जाणार आहे. भारत जोडो यात्रा झाली तशी ही चळवळ आपल्या गावापासून सुरू होईल, असेही पटोले म्हणाले.
‘पराभवानंतर आंदोलन करता’सदाभाऊ खोत म्हणाले, २००४ साली काँग्रेसने ईव्हीएम भारतात आणली. याच मशीनच्या माध्यमातून दहा वर्षे सरकारचा कारभार केला. आता पराभव झाला की ईव्हीएमच्या नावाने आंदोलन करत आहेत. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एका वर्षाच्या आत जयसिंह मोहिते-पाटील जेलमध्ये दिसतील. शंकर साखर कारखान्यावर सहा महिन्यांत प्रशासकदिसेल, असे राम सातपुते यांनी सांगितले.
बैलगाडीतून मिरवणूकहेलिकाॅप्टरमधून उतरल्यानंतर बैलगाडीतून आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, माजी आमदार राम सातपुते यांची मिरवणूक काढण्यात आली.