विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:55 PM2024-06-27T13:55:38+5:302024-06-27T13:57:11+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला.
मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे वाचून दाखवली. या आमदारांचे राजीनामा स्वीकारल्याची माहिती नार्वेकर यांनी सभागृहाला दिली.
विधानसभा सकाळी ११ वाजता सुरु होताच राष्ट्रगीत, राज्यगीतानंतर प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी अध्यक्षांनी विधानसभा सदस्यांच्या सदस्यत्वपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा नियम ९९ (२) च्या तरतुदींना अनुसुरून सभागृहाला कळवतो, खालील विधानसभा सदस्यांनी दिलेला राजीनामा मी पुढील दिनांकापासून स्वीकारला आहे असं त्यांनी सांगितले.
राजू पारवे, काँग्रेस आमदार
राजीनामा स्वीकारल्याची तारीख - २४ मार्च २०२४
निलेश लंके, राष्ट्रवादी आमदार
राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १० एप्रिल २०२४
प्रणिती शिंदे, काँग्रेस आमदार
राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १० जून २०२४
बळवंत वानखेडे, काँग्रेस आमदार
राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १२ जून २०२४
प्रतिभा धानोरकर, काँग्रेस आमदार
राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १३ जून २०२४
संदीपान भुमरे, शिवसेना आमदार
राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १४ जून २०२४
रवींद्र वायकर, शिवसेना आमदार
राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १४ जून २०२४
वर्षा गायकवाड, काँग्रेस आमदार
राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १८ जून २०२४
वरील सदस्यांपैकी राजू पारवे वगळता सर्व सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. नियमानुसार त्यांना दोन्ही पैकी एक पद ठेवता येते. त्यानुसार या आमदारांनी लोकसभा सदस्यत्वाचं पद ठेवत आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे हे रामटेकमधून शिवसेना महायुतीचे उमेदवार होते. त्यांचा काँग्रेस उमेदवाराने पराभव केला. तर निलेश लंके यांनी अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंचा पराभव करून दिल्ली गाठली आहे. प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधून राम सातपुते या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला. बळवंत वानखेडे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यांनी भाजपाच्या नवनीत राणा यांचा पराभव केला.
तसेच प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाची धूळ चारून दिल्ली गाठली. संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला. भुमरे यांनी चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील यांचा पराभव केला. रवींद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विजयी झाले. त्यांनी उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. तर वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्यमधून विजय मिळवला. भाजपाचे उज्ज्वल निकम यांचा पराभव वर्षा गायकवाडांनी केला.