Vijay Wadettiwar On Ashok Chavan (Marathi News) मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले अशोक चव्हाण हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा हा काँग्रेससोबत महाविकास आघाडीलाही धक्का मानला जात आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांनी दिलेला राजीनामा धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच, अशोक चव्हाण यांनी राजीमाना देण्याचा निर्णय का घेतला, याचेही कारण स्पष्ट नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला हे धक्कादायक आहे. त्यांनी हा निर्णय अचानक का घेतला? याच्यामागे कारण काय? याबाबतही कल्पना नाही. त्यांनी कोणाशी चर्चा केली का हे माहीत नाही, परंतु त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. मी त्यांना 2007 पासून ओळखतो. आता जवळपास 17 वर्षे झाली. त्यांच्याशी माझे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे मी देखील राजीनामा देणार अशा वावड्या उठवल्या जात आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
याचबरोबर, मध्यंतरीच्या काळात अशोक चव्हाण यांच्यामागे चौकशीचा फेरा लागल्याचेही समोर आले होते. मात्र त्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ज्या पद्धतीने भाजपा असे फोडाफोडीचं राजकारण करत आहे, ते सर्वसामान्यांना आवडणारे नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना सर्वसामान्य नक्कीच धडा शिकवतील, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?"मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे, पक्षाच्या वर्किंग कमीटीचाही राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. मला कोणाबद्दल तक्रार करायची नाही. मला कोणाबद्दल व्यक्तीगत काही बोलायचे नाही. या पुढची राजकीय दिशा मी दोन दिवसात घेईन, अजूनही ठरवलेले नाही, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी राजीमाना दिल्यानंतर दिली आहे. तसेच, भाजपामध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले.