मुंबई : रेल्वे प्रवासा दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत रेल्वेच्या नविन कायद्यात बदल केला जाणार आहे. यात नुकसानभरपाईचा भार रेल्वेवर कमी पडावा यासाठी कायद्यात करण्यात येत असलेल्या तरतुदीत अपघातग्रस्त प्रवाशाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई न मिळण्यासाठीच प्रयत्न करण्यात येत असून त्याला लोकल प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे. संसद स्थायी समिती (रेल्वे) अध्यक्ष दिनेश त्रिवेदी, समितीचे सदस्य तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेचे अधिकारी तसेच प्रवासी संघटना यांची नरीमन पॉर्इंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये रेल्वेच्या अॅमेंडमेन्ट अॅक्ट (बिल) २0१४ मधील नविन तरतुदींवर एक बैठक झाली. या बैठकीत प्रथम सर्व प्रवासी संघटनांचे मत घेण्यात आले आणि त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना किमान चार लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. रेल्वे न्यायालयात गेल्यानंतर सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांचे सोपस्कार पार पाडल्यानतर ही नुकसान भरपाई मिळते. १९९१ सालापासून अशाप्रकारच्या नुकसानभरपाईची तरतुद करण्यात आली असून आता या तरतुदीत नविन रेल्वे कायद्यात बदल करण्याचे सूचविण्यात आले आहे. हा तर प्रवाशांवर अन्याय होण्यासारखे आहे. रेल्वे आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे आमचा याला जोरदार विरोध आहे, असे रेल्वे अॅक्सिडेंट व्हिक्टिम असोसिएशन अध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले. चुकीची तरतुद करण्यात येत असून त्याला आमचा विरोध आहे, असे मुंबई रेल यात्री संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणाले.
रेल्वे अपघातग्रस्तांच्या नुकसान भरपाईतील बदलाला विरोध
By admin | Published: February 13, 2015 1:48 AM