मुंबई : महापारेषण कंपनीच्या अभियंता आणि तांत्रिक कामगारांची १ हजार ५०० पदे कमी करण्याच्या धोरणास महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेने विरोध दर्शवला आहे. महापारेषणकडून यावर ३१ जानेवारीपर्यंत सर्व संघटनांचा सुधारित प्रस्ताव मागवण्यात आला असून, फेब्रुवारीपर्यंत हे प्रकरण निकाली काढले नाही, तर पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल, असा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे, असे कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन यांनी सांगितले. विभाजनानंतर महापारेषणने २००९ व २०१३मध्ये कंपनीचा स्टाफ सेटअप घोषित केला. त्यातील एकूण मंजूर पदे १३ हजार ८०६ होती. संघटनेच्या मागणीनंतर २०१० साली सहायक यंत्रचालक व तंत्रज्ञ-४च्या सुमारे ५ हजार पदांची सरळ भरती करण्यात आली. यात सहायक यंत्रचालकांची मंजूर पदे केवळ १४८ असताना २ हजार पदांची भरती करण्यात आली. परिणामी, २ हजार यंत्रचालकांच्या २ हजार रिक्त पदांवर सहायक यंत्रचालकांना दोन वर्षांतच पदोन्नती देण्यात आली. मात्र यासोबतच समान शैक्षणिक अर्हता असलेल्या परंतु गुणांची टक्केवारी कमी असल्याने तंत्रज्ञांना बढती मिळाली नाही. संघटनेच्या आंदोलनानंतर महापारेषणने नवीन स्टाफ सेटअप मंजूर करून संघटनांसमोर सादरीकरणही केले. (प्रतिनिधी)
महापारेषणमधील पदे कमी करण्यास विरोध
By admin | Published: January 16, 2017 6:28 AM