मुंबई : ‘पॉइंट टू पॉइंट’ सेवा सुरू करण्यासाठी मॅक्सीकॅबला परवानगी एमएमआरटीएकडून (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) देण्यात आल्यानंतर शासनाकडून त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाला एसटी महामंडळाचा विरोधच असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीसाठी एसी बेस्ट बस सेवा, ठाणे परिवहन सेवा, नवी मुंबई परिवहन सेवा इत्यादी संस्थांमार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. ही सेवाही अपुरी असून खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सक्षम पर्याय उपलब्ध करण्यात यशस्वी झालेली नाही. त्यामुळे बारा आसनी एसी मॅक्सीकॅब सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला जुलै महिन्यात एमएमआरटीने मंजुरी दिली. मॅक्सीकॅबला शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यास एमएमआरटीए क्षेत्रात ती सेवा दिली जाईल. मॅक्सीकॅबला सार्वजनिक परिवहन सेवांच्या युनियनकडून विरोध करण्यात आला आहे. यामध्ये एसटी युनियनचाही समावेश आहे. युनियनकडून भूमिका स्पष्ट करण्यात आल्यानंतर एसटी महामंडळाने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांना विचारले असता, एसटी महामंडळाचा मॅक्सीकॅबला विरोधच आहे; आणि महामंडळाची ही भूमिका आधीपासूनच असल्याचे स्पष्ट केले. आमची यात मक्तेदारी आहे आणि ती आम्ही सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)।च् मॅक्सीकॅबला सार्वजनिक परिवहन सेवांच्या युनियनकडून विरोध करण्यात आला आहे. त्याचा अंतिम निर्णय हा शासनाकडून घेण्यात येणार आहे. मात्र सध्या न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मॅक्सीकॅबचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यासाठी नवीन परवाना वाटप करण्यात आलेले नसल्याची माहिती दिली.
मॅक्सीकॅबला एसटी महामंडळाचा विरोध
By admin | Published: August 27, 2016 5:12 AM