शिर्डी : विमानतळासाठी शासनाने साईबाबा संस्थानकडे मागितलेल्या ११० कोटी रुपयांचा प्रस्ताव संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत अमान्य करण्यात आला आहे.शासनाने साईबाबांच्या तिजोरीत हात घालून विविध कारणांसाठी निधी नेण्याचा सपाटा लावला होता़ जलशिवार योजनेसाठी ३४ कोटी, राज्यातील जिल्हा रुग्णालयांसाठी ४३ कोटींचा निधी देण्यात आला. काकडी येथे होणाऱ्या विमानतळासाठी साईबाबांच्या झोळीतून ११० कोटी संस्थानने द्यावेत, असा प्रस्ताव शासनाने पाठविला होता़ त्याबाबत अहमदनगर येथे व त्यानंतर सोमवारी मुंबईत बैठक होणार असल्याचे समजताच, शिर्डीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यास विरोध दर्शविला. साईबाबांच्या झोळीतील पैसे शासनाने विमानतळासाठी नेले, तर सलग दोन दिवस शिर्डी बंद ठेवण्याचा इशारा दिला होता़ शहरातील मूलभूत सुविधा साईभक्तांना उपलब्ध नसल्याने भक्तांचे हाल होत आहेत़ संस्थानचे विविध विकासकामांचे डझनभर प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडले असताना त्याकडे शासनाला लक्ष देण्यास वेळ नाही, असा आक्षेप सदस्यांनी घेतला. (प्रतिनिधी) अहमदनगर येथे त्रिसदस्यीय समितीच्या झालेल्या बैठकीत पैसे देण्याबाबत कोणताही निर्णय न घेता शताब्दी वर्ष जवळ आल्याने हजार कोटी रुपयांचे काम बाकी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. समितीचे सदस्य व शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, नगराध्यक्षा सुनीता जगताप, उपनगराध्यक्ष नीलेश कोते व नगरसेवकांनी राज्य सरकारला पैसे देण्यास विरोध दर्शविला.
विमानतळाच्या निधीला साई संस्थानचा विरोध
By admin | Published: November 30, 2015 3:05 AM