लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केळकर रोडवरील महावितरणचे तीन ट्रान्सफॉर्मर बाजीप्रभू चौकातील केडीएमटीच्या बसस्टॅण्डमध्ये स्थलांतर करण्यास भाजपाचे स्थानिक नगरसेवक विश्वदीप पवार यांनी विरोध केला आहे. पवार यांनी त्यासाठी सुरू असलेले काम बुधवारी रात्री बंद पाडले.केळकर रोडवरील ट्रान्सफॉर्मर हलवण्यासाठी बुधवारी केडीएमसीच्या बसस्टॅण्डमधील शेड महापालिकेने जेसीबीद्वारे जमीनदोस्त केले. मात्र, जेसीबीने महापालिकेच्या सयाजी गायकवाड शाळेची भिंतही तोडली. त्यामुळे गायकवाड शाळा आणि त्याशेजारील के.बी. वीरा शाळेतील विद्यार्थी तसेच केडीएमटीच्या स्टॅण्डमध्ये उभ्या राहणाऱ्या प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या जीवाला काही झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल पवार यांनी केला. शाळेची भिंतही विनापरवानगी तोडल्याचे पवार म्हणाले. त्यामुळे या कामावर आक्षेप घेत पवार यांनी ते काम बंद पाडले.शहरातील महापालिकेची उपविभागीय इमारत आणि अन्य जागेसंदर्भात भविष्यात बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्यालाही या ट्रान्सफॉर्मरमुळे अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे ते काम येथे होऊ नये, या भूमिकेवर पवार ठाम होते. त्यासंदर्भात त्यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असल्याचेही ते म्हणाले. नागरिकांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर तेथे स्थलांतरित करू दिला जाणार नाही. रामनगर प्रभागात अन्य ठिकाणीही जागा आहेत. तेथे त्याचे स्थलांतर करण्यासाठी महावितरण व महापालिकेने विचार करावा, असे पवार यांचे म्हणणे आहे.नगरसेवकाच्या समर्थकांवर गुन्हा केडीएमटीच्या स्टॅण्डमधील शेड महापालिकेने तोडल्यानंतर तेथील डेब्रिज उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदाराचे मजूर करत होते. या मजुरांना नगरसेवक पवार यांचे समर्थक शक्तिमान आणि अन्य दोघांनी दोघा मजुरांना मारहाण केली. त्यानुसार, याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शक्तिमान व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रान्सफॉर्मर स्थलांतराला विरोध
By admin | Published: June 09, 2017 3:30 AM