नागपूर - मागील हिवाळी अधिवेशनात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ३५ हजार ५०० रुपयांची तर धान उत्पादकांना १४ हजारांची मदत सरकारने जाहीर केली होती. परंतु ती अद्याप मिळालेली नाही. हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का? मदत कधी देणार हे आधी जाहीर करा, त्यानंतरच कामकाजाला सुरुवात करा अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी विधान परिषदेत घेत यावर २८९ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही मागणी फेटाळल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. दोनदा सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम असल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात झाल्यानंतर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले विलास पोतनीस, कोकण पदवीधरमधील निरंजन डावखरे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले किशोर दराडे यांचा शपथविधी झाला. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारताच धनंजय मुंडे यांनी बोंडअळी व धान उत्पादक नुकसानग्रस्त शेतकºयांना सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत अद्याप मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. डिसेंबर २०१७ मध्ये याच सभागृहात झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने बोंडअळीसाठी प्रतिहेक्टरी ३७ हजार ५०० आणि धानावर आलेल्या तुडतुडा रोगाच्या नुकसान भरपाईसाठी १४ हजार रुपये देण्याची सरकारने घोषणा केली होती. ते कधी देणार, ते सांगा आणि नंतरच कामकाज करा. मात्र, सभापतींनी प्रश्नोत्तराच्या तासात अशा प्रकारचा प्रस्ताव मांडता येत नसल्याने सांगून तो नाकारला. यावर विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
बोंडअळीच्या भरपाईवरून विरोधक परिषदेत संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:50 AM