अमरावती : सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हाभरात हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतक-यांना सरसकट सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याचा ठराव गुरूवारी अमरावती जिल्हा परिषदेत पारित करण्यात आला.जिल्ह्यात कपाशीचे पीक ऐन बहरात आले असताना बोंडअळीने उरल्यासुरल्या कपाशीवर आक्रमण केले. यामुळे शेतक-यांवर बहरत असलेले कपाशीचे पीक उपटण्याची वेळ आली आहे.
शेतक-यांनी यंदा खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशीतून उत्पन्नाची समाधानकारक अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, या पिकांवर बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरात सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या नुकसानापाठोपाठ कपाशीवरील बोंडअळीने शेतक-यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. यावर्षी शेतक-यांची परिस्थिती बिकट झाली असल्यामुळे राज्य शासनाने अमरावती जिल्ह्यातील कपाशी पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गौरी देशमुख, बबलू देशमुख, संजय घुलक्षे व अन्य सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभेत मांडला. तो ठराव एकमताने पारित करून शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, माजी अध्यक्ष बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, भाजपा गटनेता प्रवीण तायडे, गौरी देशमुख, सुहासिनी ढेपे व सर्व सदस्य उपस्थित होते.