मुंबई : शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला. त्यामुळे आता सहा मंत्र्यांसह आमदारांबाबत ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.
शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात ही बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे आले तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले. कार्यकारिणीने मंजूर केलेल्या सहा ठरावांमध्ये म्हटले आहे की, शिवसेना ही बाळासाहेबांची होती, आहे आणि राहील. इतर कुणीही स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरू शकत नाही. तसे केल्यास रीतसर तक्रार आणि कारवाई करण्यासाठीची पावले उचलली जातील. शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक महानगरपालिकेवर भगवा फडविण्याच्या निर्धार अन्य एका ठरावाद्वारे करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आजवर पक्षाच्या प्रगतीसाठी केलेले काम आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोरोनाकाळात केलेले उल्लेखनीय काम याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
नाथ होते, आता दास झाले शिवसेना एक निखारा आहे, त्यावर पाय ठेवाल तर जळाल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिला. स्वत:च्या बापाच्या नावानं मते मागा, आधी नाथ होते आता दास झाले. बंडखोरांना त्यांचा निर्णय आधी घेऊ द्या, शिवसैनिकांचे प्रेम माझ्यावर आहे असे ते म्हणाले. गद्दारांना परत घेऊ नका अशी मागणी कार्यकारिणीतील नेत्यांनी केली. त्यावर त्यांना परत घेणार नाही, असे ठाकरे म्हणाले.