जळगाव : कर्जबाजारी शेतकरी जीवन संपवत आहेत. बसच्या पाससाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीवर आत्महत्येची वेळ येते, असे असताना शहरे स्मार्ट करण्याच्या योजना कशाला राबविता? त्यापेक्षा सामान्यांना, शेतकऱ्यांना जगविण्याच्या योजना राबवा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत भाजपावर टीकास्त्र सोडले. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ते रविवारी येथे आले होते. खान्देशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २२२ वारसांना प्रत्येकी १० हजार रुपये मदतीचे वाटप त्यांच्या हस्ते झाले. केळी, कापूस, कांदा व द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. शिवसेना स्टाईलने ते मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, उपनेते आ. गुलाबराव पाटील आदी त्यांच्यासोबत दौऱ्यात होते. दिल्लीतील घडामोडींकडे अंगुलीनिर्देश करीत ते म्हणाले की, ‘सध्या सुडाचे राजकारण चालले आहे. निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेविरोधात आंदोलन करणाऱ्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनाच अटक केली जाते. आरोपी मोकाट व पीडितेचे आई वडील अटकेत, हा कुठला न्याय? सुडाचे राजकारण तुम्हालाच लखलाभ,’ अशी टीका त्यांनी भाजपावर केली.
‘स्मार्ट सिटी’पेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा!
By admin | Published: December 21, 2015 2:23 AM