लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात कातकरी समाजाची लोकवस्ती मोठी आहे. मात्र आजही हा समाज मूलभूत सोयी- सुविधांपासून वंचित आहे. या समाजाच्या समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांनी सोमवारी राजभवनात राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, निवारा आदी सुविधांपासून अद्यापि बहुतांश कातकरी समाज वंचित आहे. कर्जत तालुक्यातील तीनशेच्यावर आदिवासी वस्तींपर्यंत रस्ते पोहचले नाहीत. कधी वनविभागाचा अडथळा तर कधी बिगर आदिवासी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रस्त्यांची कामे रखडली. परिणामी जंगलातून पाच ते दहा किलोमीटर पायपीट करत मजुरीसाठी यावे लागते. रु ग्णांना झोळीतून न्यावे लागते. दळणवळणाची सोय नसल्याने या आदिवासी वाड्या-पाड्यांचा विकास खुंटला आहे. तरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या व प्रस्तावित केलेल्या रस्त्यांबाबत सरकारला आदेशित करावे अशी मागणी डामसे यांनी केली. तालुक्यात एक ग्रामीण रु ग्णालय, सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे, बत्तीस उप केंद्रे आणि कर्जत शहरात उपजिल्हा रु ग्णालय आहे . परंतु डॉक्टरचा, औषधांचा अभाव यामुळे ही आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे आदिवासींना आरोग्य सेवा मिळत नाही. तालुक्यात एकावन्न ग्रामपंचायती आहेत. त्यातील सहा ग्रामपंचायतीला दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय पेण येथे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा कार्यभार या कार्यालयावर आहे. त्यामुळे पेण कार्यालय स्वतंत्र करून कर्जत येथे स्थलांतरित करावे, तसेच ते सध्या भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे त्यासाठी हक्काची इमारत उभारावी आदी मागण्या रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना सादर केलेल्या निवेदनात केल्या आहेत.
समस्यांच्या निराकरणासाठी राज्यपालांना साकडे
By admin | Published: June 07, 2017 3:43 AM