- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी केल्या जाणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर घातलेली बंदी उठवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. परिणामी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलासा मिळाला असून, मेट्रो-३ चा मार्ग मोकळा झाला आहे.मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे ५ हजार झाडांची कत्तल होणार असल्याने चर्चगेट व कफ परेड येथील रहिवाशांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सुरुवातीला झाडांच्या कत्तलीला स्थगिती दिली. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वकिलांनी हा प्रकल्प कसा जनहिताचा आहे आणि मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचा आहे, हे पटवून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने ५ मे रोजी झाडांच्या कत्तलीवर दिलेली स्थगिती हटवली. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा बराच त्रास कमी होणार असून वाहतूककोंडीसारखा गंभीर प्रश्नही सुटणार आहे. पर्यावरणाचे जतन आणि विकासकामे यांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. मात्र नीना वर्मा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा झाडांच्या कत्तलीवरील स्थगिती हटवण्याचा निर्णय योग्यच असल्याचे म्हणत मेट्रो-३ ला प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयामुळे कॉर्पोरेशनला मोठा दिलासा मिळाला आहे.- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पर्यावरणावर यापूर्वीच ‘उतारा’ शोधून काढला आहे. कॉर्पोरेशनद्वारे ‘प्रकल्प परिसर’ या हरित उपक्रमांतर्गत कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील प्रस्तावित २७ स्थानकांच्या परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था, शाळा आणि रुग्णालयांमध्ये २५ हजारांहून अधिक वृक्षांच्या रोपांचे वाटप केले जात आहे.- मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाप्रमाणे मेट्रो-३ च्या प्रस्तावित २७ स्थानकांवर एकूण ३ हजार ८९१ झाडे आहेत. त्यापैकी १ हजार ७४ झाडे कापण्यास तर १ हजार ७२७ झाडांचे पुनर्रोपण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.- वृक्ष प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार प्रत्येक कापल्या जाणाऱ्या झाडामागे ३ झाडे लावणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे तोडल्या जाणाऱ्या झाडांची भरपाई म्हणून कॉर्पोरेशन ३ हजार झाडे लावणार आहे.- मेट्रो-३ प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर जवळपास ६ हजार ८०० टन कार्बनडाय आॅक्साइड तसेच इतर हरित गृह वायूंचे प्रमाण कमी होईल, असा दावा केला जात आहे.- मेट्रो-३ या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पामुळे दररोज जवळपास ६.५ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होतील.- विमानतळांना जोडण्याकरिता साधारणत: स्वतंत्र मेट्रो वाहिन्या असतात. मात्र मेट्रो-३ विमानतळासह मुंबईतील बीकेसी, दादर, वरळी, महालक्ष्मी, चर्चगेट या प्रमुख केंद्रांना जोडणारा एकमेव मार्ग ठरणार आहे.