मुंबई : भगवान महावीर यांच्या २ हजार ६१५ व्या जयंतीनिमित्त जैन एकता महासंघाने बुधवारी नायगाव ते काळाचौकी भव्य रथयात्रेचे आयोजन केले होते. या वेळी महासंघाने मराठवाड्यातील एक हजार पशूंसाठी चारा-पाणी आणि त्यांना सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा संकल्प केला आहे. महावीर जयंती साजरी करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचेही या वेळी जैन महासंघाने स्पष्ट केले.जैन मुनी विनम्रसागर महाराज यांनी प्रवचनादरम्यान सर्व जैन बांधवांनी तन, मन आणि धनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. महासंघातर्फे गेल्या महिन्याभरापासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे चारा छावणी सुरू आहे. या ठिकाणी ४५० पशू आणि शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था महासंघाने केली आहे. मात्र, त्यात वाढ करण्यासाठी महावीर जयंतीहून मोठे निमित्त असूच शकत नाही, असे ते म्हणाले. शिवाय, उपस्थितांनी पशुंसाठी चारा व पाणी आणि शेतकऱ्यांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था व्हावी, म्हणून सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले. त्याला साथ देत उपस्थितांमधील जैन संघांनी आणि व्यक्तींनी हजारो आणि लाखो रुपयांची मदत जाहीर केली.या आधी महासंघाने नायगावपासून काळाचौकीपर्यंत आकर्षक रथयात्रा काढली. त्यात लालबाग, काळाचौकी, घोडपदेव, परळ, शिवडी आणि कॉटनग्रीन येथील ३२ जैन संघ एकत्र आले होते. वर्धमान हाइट्सजवळ रथयात्रेचा समारोप केल्यानंतर प्रवचनाला सुरुवात झाली. लहानांपासून थोरांपर्यंतचा जैन समाज या रथयात्रेत पारंपरिक वेशभूषेमध्ये सामील झाल्याचे दिसले. शिवाय, ३००हून अधिक दुचाकीस्वार युवावर्ग जैन समाजाचा पंचरंगी झेंडा घेऊन सामील झाला होता.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा संकल्प
By admin | Published: April 21, 2016 4:41 AM