श्यामकांत पाण्डेय धारणी (जि़ अमरावती) पुरेशी जनजागृती झालेली नसल्याने देहदान करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यात कुपोषणाचा अभिशाप असलेल्या मेळघाटात तर देहदानाचा विचारही कोणाच्या मनाला शिवत नाही. परंतु पतीच्या मृत्यूनंतर सतत मनात घोळणाऱ्या देहदानाच्या इच्छेला कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करून मूर्त रुप देत शोभा इंदरसिंह रंधावा यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला. शोभा रंंधावा यांनी त्यांचे देहदानाचे संकल्पपत्र येथील समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सुपूर्द केले. धारणी शहरातील शोभा रंधावा या देहदान करणाऱ्या मेळघाटातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. २००५ साली त्यांचे पती इंदरसिंह रंधावा यांचे निधन झाले. शहरात त्यांचा आरामशिनचा व्यवसाय होता. पतीच्या निधनानंतर शोभातार्इंच्या मनात देहदानाची इच्छा जागृत झाली. शोभातार्इंनी याचदरम्यान उत्तर प्रदेशातील नैमिषारण्य येथे महर्षी दधिची यांच्या आश्रमाला भेट दिली. दधिची महर्षी यांनी देवलोकाच्या कल्याणासाठी आपल्या हाडांचे दान दिले होते. या कथेने प्रेरित होऊन शोभातार्इंनी देहदानाचा संकल्प केला. दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांनी समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयात संकल्पपत्र भरले. हा निर्णय घेण्यापूर्वी शोभातार्इंनी आपल्या मुुला-मुलींना याची पूर्वकल्पना दिली. त्यांनीही आईच्या या निर्णयाला समर्थन दिले.
मेळघाटातील महिलेचा देहदानाचा संकल्प
By admin | Published: July 10, 2015 2:40 AM