यवत (जि. पुणे) : प्राथमिक शिक्षकांना समस्या सोडविण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ येऊ देणार नाही. बदली धोरणाबद्दलचा प्रश्न लवकरच सोडविला जाईल, असे आश्वासन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी चौफुला (ता. दौंड) येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित महामंडळ सभेत दिले.अध्यक्षस्थानी दौंडचे आमदार राहुल कुल होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे व संभाजी थोरात यांनी जुनी पेन्शन योजना मिळविणे, सातवा वेतन आयोग लागू करण्याची भूमिका ठरविणे, जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली धोरणाबाबत भूमिका ठरविणे व संगणक प्रशिक्षण मुदतवाढसाठी निर्णायक भूमिका घेणे आदी मुख्य मागण्या मांडल्या.शिक्षकांच्या मागण्यांबाबत मंत्री महादेव जानकर यांनी शिक्षक नेत्यांची भाषणे सुरू असताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधून शिक्षकांच्या मागण्या त्यांना सांगितल्या. त्यांनीदेखील शिक्षकांच्या मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका असल्याचे आश्वासन दिल्याचे या वेळी जानकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘शिक्षकांच्या बदलीचा प्रश्न सोडविणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2017 3:46 AM