सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - आजच्या काळातही देशाच्या सर्वांगिण विकासासाठी आपली सारी गुणवत्ता पणाला लावून जे संसद सदस्य झटतात, आदर्श संसदीय परंपरांचे पालन करतात, त्यांचा यथोचित सन्मान व्हायलाच हवा, असे उद्गार उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी बुधवारी येथे काढले. लोकशाही केवळ ५१ विरुद्ध ४९ असा संख्याबळाचा गणिती खेळ नसून, सारासार विचारांच्या आदान प्रदानातून देशाचा व्यापक आणि सर्वसमावेशक विकास साधण्याची अलौकिक प्रक्रिया असे विधान माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आदर्श संसदपटूचा पुरस्कार स्वीकारताना केले होते. त्याचे स्मरण आज मला होत आहे, असेही अन्सारी म्हणाले.लोकमत संसदीय पुरस्काराने ज्या ८ मान्यवर खासदारांना आज येथे सन्मानित करण्यात आले, ते नि:संशय त्या योग्यतेचे आहेत. संसदीय कामकाजात त्यांनी मोलाची भर घातली आहे असे नमूद करीत उपराष्ट्रपती अन्सारी म्हणाले की, लोकमत देशातील अग्रगण्य वृत्तपत्र समूह आहे. आदर्श संसदपटूंच्या गुणवत्तेची कदर करून त्यांना विशेष पुरस्कार प्रदान करावेसे वाटले, त्याबद्दल लोकमत वृत्तपत्र समूहदेखील अभिनंदनास पात्र आहे.दिल्लीच्या विज्ञान भवनाच्या सभागृहात या समारंभासाठी तुडुंब गर्दी झाली होती. उपराष्ट्रपतींच्या हस्ते लोकसभेतील अनुक्रमे सुश्मिता देव, एम. के पे्रमचंद्रन यांना सर्वोत्कृष्ठ संसद सदस्य या पुरस्काराने तर लालकृष्ण अडवाणींना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे राज्यसभेतील अनुक्रमे श्रीमती रजनी पाटील, जया बच्चन, सीताराम येचुरी यांना सर्वोत्कृष्ठ संसद सदस्य या पुरस्काराने तर शरद यादव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सदस्यांची नावे पुकारली जाताच, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. काही अपरिहार्य कारणास्तव लोकसभा खासदार मीनाक्षी लेखी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हत्या. व्यासपीठावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा तसेच एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा होते. सभागृहाबाहेर श्रोत्यांची बरीच गर्दी झाली होती. अनेकांना जागेअभावी परत जावे लागले. व्यंकय्या नायडू म्हणाले, भारतीय लोकशाही साऱ्या जगात गौरवाला पात्र ठरली आहे. तथापि हा गौरव कायम टिकवण्याची जबाबदारी संसद सदस्य व देशाच्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून आहे. प्रसारमाध्यमांनी संसद सदस्यांना पुरस्कार देण्याची संकल्पना निश्चितच अभिनव आहे. मात्र हा पुरस्कार केवळ गौरवासाठी नसून, आदर्श कामकाजातून देशाची लोकशाही व्यवस्था सुदृढ व्हावी या अपेक्षेने दिला गेलेला आहे. या पुरस्कारामुळे अन्य खासदारांनाही चांगली कामगिरी बजावण्याचे प्रोत्साहन मिळेल, याचा मला विश्वास वाटतो. लोकसभेत बहुमत महत्त्वाचे असले तरी सत्ताधारी आणि विरोधक हे काही परस्परांचे शत्रू नव्हेत. विविध राजकीय विचारांचे प्रतिनिधित्व करणारे संसद सदस्य आपापल्या परीने संसदीय कामकाजात मोलाची भरच घालीत असतात. राजकीय व वैचारिक मतभेद असणे लोकशाहीला पोषक आहे. वॉक आऊ ट (सभात्याग) समजू शकतो, मात्र ब्रेक आऊट नको, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. आपल्या गौरवशाली संसदीय इतिहासाच्या पानांमधे ज्या महान नेत्यांनी आपल्या ओजस्वी भाषणांची भर घातली ती नव्या खासदारांनी वाचली पाहिजे, असे नायडू म्हणाले. पुरस्कार विजेत्यांच्या गुणवत्तेचे विश्लेषण करताना लोकमत पुरस्कार निवड मंडळाचे अध्यक्षशिवराज पाटील म्हणाले की, संसदीय कामकाजात विविध विषयांच्या चर्चेत सहभागी होताना या खासदारांनी साऱ्या देशाचा विचार आपल्या डोळ्यांसमोर ठेवला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये देशाच्या हिताबरोबरच जागतिक शांततेचे भान ठेवले. संसदीय कामकाजाच्या नियमांचे व आदर्श परंपरांचे पालन केले. कार्यक्रमाचे अत्यंत सुरेख सूत्रसंचालन नागपूरच्या श्वेता शेलगांवकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांमधे शरद पवार, फारूख अब्दुल्ला या नेत्यांखेरीज केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक सदस्य, दोन्ही सभागृहांतील आजी माजी खासदार, विविध देशांचे राजदूत, पत्रकार व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू असल्याने अनेक नेते, मंत्री तसेच खासदारांना इच्छा असूनही समारंभाला पोेहोचता आले नाही.साऱ्या सभागृहाचे लक्ष वेधून घेणाऱ्या लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चित्तवेधक ट्रॉफीचे डिझायनिंग संदीप पिसाळकर यांनी केले होते तर निर्मिती दिल्लीच्या गुरूमीतसिंग यांनी केली.
>पुरस्कारांमागील भूमिकाप्रास्ताविक भाषणात लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी या संसदीय पुरस्कारांची संकल्पना विषद केली आणि लोकमतच्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांचाही थोडक्यात आढावा घेतला. एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डां यांनी आभार प्रदर्शन केले. >खासदारांची वैशिष्ट्येभपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी आपल्या भाषणात लालकृष्ण अडवाणी यांच्या कारकीर्दीचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला त्याचबरोबर पुरस्कार विजेत्या प्रत्येक खासदाराची खुमासदार शैलीत वैशिष्ट्ये उपस्थितांना ऐकवली.>अडवाणी यांना जीवनगौरवभाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करताना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी़ यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विजय दर्डा तसेच व्यंकय्या नायडू दिसत आहेत. >आजच्या काळातही देशाच्या सर्वांगिण विकासासाठी आपली सारी गुणवत्ता पणाला लावून जे संसद सदस्य झटतात, आदर्श संसदीय परंपरांचे पालन करतात, त्यांचा यथोचित सन्मान व्हायलाच हवा. - हमीद अन्सारी, उपराष्ट्रपती