मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांसह बाळासाहेबांच्या चाहत्यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुपारी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत आदरांजली वाहिली. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी केली होती. दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्मृतीस्थळावर आदराजंली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपा खासदार पूनम महाजन, काँग्रेसचे भाई जगताप, पालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी यांनीही स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. संसदेचे अधिवेशन चालू असतानाही शिवसेनेचे सर्व खासदार गुरुवारी शिवाजी पार्कवर उपस्थित होते. शिवसेनेचे केंद्र आणि राज्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार, नेते, पदाधिका-यांनी स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन केले. जिज्ञासा आर्टस्च्या कलाकारांनी फुलांची भव्य रांगोळी घातली होती. तर, शिवाजी पार्ककडे जाणा-या सर्व रस्त्यांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच अल्पोपहार आणि पाण्याचे काउंटरही उभारले होते. (प्रतिनिधी)
बाळासाहेबांना आदरांजली
By admin | Published: November 18, 2016 6:34 AM