गोवा - एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात बोलणं झालेले होतं. राज ठाकरे जुने शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल जो आदर तोच राज ठाकरेंबद्दल आहे. अशा प्रसंगात सगळे एकत्र येतात. ज्या ज्यावेळी महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही आवाहन करतील तेव्हा सगळे पक्ष एकत्र येतील. कार्यकर्त्याच्या भूमिकेतून ते वरच्या पातळीवर पोहचले आहे. वर्षानुवर्षे कामगिरीतून हे संबंध विकसित होतात. ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण करणारा खरा शिवसैनिक कसा असतो याचं उदाहरण एकनाथ शिंदे आहेत अशा शब्दात शिंदे गटाचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी कौतुक केले आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकला आहे. मराठी माणसांत निश्चित आनंदाचं वातावरण असेल. आनंदाच्या क्षणी कुणावरही टीका नाही. १०६ पक्षाचे आमदार असताना भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देऊन मोठं मन दाखवलं. अनेक विकासकामे देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सुरू झाले. दिल्लीशी त्यांचे संबंध चांगले आहेत. फडणवीस-शिंदे यांचे एकमेकांशी सुसंवाद चांगला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याने उद्धव ठाकरेंनाही आनंद झाला असेल. पक्षप्रमुख मुख्यमंत्री होत असल्याने कुणीही नाराज नव्हतं. परंतु हा बदल महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने होतोय. विचारांची ही लढाई होती. महाराष्ट्रात चांगले वातावरण राहील. बाळासाहेब ठाकरेंची जी भूमिका होती. त्याच विचारावर हे सरकार आले आहे. सुरूवातीला हे घडलं असतं तर आनंद झाला असता परंतु उशिरा होईना पण घडलेले आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद एकनाथ शिंदे यांच्यामागे राहील. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वजण एकत्र आले तर राज्य बलवान होईल असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक बसला एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार दिल्याने आम्ही मंत्रिपदाच्या अपेक्षेने आलो नाही. ६ मंत्री आमच्यासोबत आले ते तत्वासाठी आले. विचारांसाठी आले. एकनाथ शिंदे सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहेत. ज्यावेळी कुठेही आपत्ती येते तिथे सर्वात आधी जाणारे नेते एकनाथ शिंदे आहे. ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण हे बाळासाहेबांची शिकवण पुढे घेऊन जात आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक बसला आहे असंही केसरकरांनी सांगितले.
राऊतांनी जनतेच्या पाठित खंजीर खुपसला हा वाद तत्वाचा होता, महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना निवडून दिले त्यांचीच युती झाली आहे. पाठित खंजीर संजय राऊतांनी खुपसला. शिवसेनेत राहून राष्ट्रवादीचं काम करतात. जनतेच्या पाठित खंजीर खुपसला. निवडून देणारी जनता असते पक्ष नसतो. जनतेनं जो कौल दिला त्यातून सरकार स्थापन झाले आहे. केंद्र आणि राज्यात वाद लावून द्यायचा हे सकाळच्या पत्रकार परिषदेतून होता. महाराष्ट्राच्या हितासाठी, विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात संबंध चांगले लागतात असा टोला दीपक केसरकरांनी संजय राऊतांना लगावला.