ऑनलाइन लोकमत
तासगाव (सांगली), दि. ५ - महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक लढवली जात आहे. बाळासाहेबांविषयी मला आदर असून त्यांना श्रद्धांजली म्हणून मी शिवसेनेवर टीका करणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. राजकारणापेक्षाही भावनिक संबंध महत्त्वाचे असतात असे मोदींनी नमूद केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं महाराष्ट्रात प्रचारसभा घेत असून या सभांमध्ये मोदींनी शिवसेनेवर टीका केली नव्हती व उल्लेखही टाळला होता. याविषयी मोदींनी रविवारी तासगावमधील सभेत भाष्य केले. मोदी म्हणाले, बाळासाहेबांविषयी मला आदर आहे. त्यांच्यावर माझी नितांत श्रद्धा असून त्यांना श्रद्धांजली म्हणून मी शिवसेनेवर टीका करणार नाही. शिवसेनेविषयी भूमिका स्पष्ट करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर.आर.पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. भाजपच्या जाहीरातींमधून महाराष्ट्राचा अपमान होतोय असे शरद पवारांनी म्हटले होते. यावर मोदींनी शरद पवारांना रविवारी प्रत्युत्तर दिले आहे. 'पवारांमध्ये शिवछत्रपतींचे गुण येण्याची शक्यता कमीच आहे. तसे असते तर पवारांनी शिवछत्रपतींनी ज्याप्रमाणे पाणी पुरवठा व वितरण व्यवस्था निर्माण केली त्यापासून प्रेरणा घेत महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवला असता व शेतक-यांचे जीव वाचवले असते असा मोदींनी सांगितले. मुंबई विमानतळ व व्हिक्टोरिया टर्मिनलला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जोडण्याचे काम अटलबिहारी वाजपेयी यांनीच केले. शिवभक्ती आमच्या रक्तात असून शिवाजी महाजांवरील प्रेमाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करु नका असेही मोदींनी विरोधकांना सुनावले आहे.