२७४७ युनिटची बचत : शहरातील दिवे एक तास बंदनागपूर : लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक विजेचा वापर टाळावा. ऊर्जा बचत करून पाण्याची व कोळशाची बचत करावी. यातून पर्यावरण संवर्धन व आर्थिक बचत व्हावी, या हेतूने महापालिकेतर्फे दर पौर्णिमेला रात्री ८ ते ९ दरम्यान एक तास दिवे बंद ठेवण्याची मोहीम राबविली जाते. त्यानुसार सोमवारी रात्री शहरातील दिवे बंद ठेवण्यात आले.पौर्णिमेच्या रात्री झाशी राणी चौक ते अंबाझरी मार्ग, एलएडी कॉलेज रोड, गांधीनगर मार्ग, वर्धा मार्ग, कामठी रोड, विजय टॉकीज, अलंकार टॉकीज यासह शहरातील विविध मार्गावरील पथदिवे बंद ठेवण्यात आले. शहरातील लोकांनी व व्यापाऱ्यांनी अनावश्यक वीज वापर टाळल्यास पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक बचत होत आहे. यापुढे ही मोहीम सुरू ठेवावी, असे आवाहन आमदार अनिल सोले यांनी केले. ऊर्जा बचतनिमित्त झाशी राणी चौक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.एक युनिट वीजनिर्मितीसाठी ५०० ग्रॅम कोळसा व ७.५ लिटर पाणी लागते. यातून मोठ्या प्रमाणात कार्बनडाय आॅक्साईड निर्माण होतो. ऊर्जा बचत करून पर्यावरण संवर्धन करा, असे आवाहन त्यांनी केले. धंतोली झोनच्या सभापती सुमित्रा जाधव, नगरसेविका लता यादव, ग्रीन व्हिजिल फाऊं डेशनचे कौस्तुब चटर्जी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, सहायक आयुक्त सुभाष जयदेव आदी उपस्थित होते. मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच चटर्जी यांच्या सहकाऱ्यांनी नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधून ऊर्जा बचत करण्याचे आवाहन केले. यावेळी सहायक अभियंता सलीम इकबाल, ए.एस.मानकर, पी.के. रुद्रकार, दक्षा बोरकर, सुरभी जैस्वाल, संदेश साखरे, हेमंत अमेसार, शीतल चौधरी, बी.डी.यादव, विश्वजित पाईकराव आदी उपस्थित होते. शहरातील सर्व भागात ही मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)
ऊर्जा बचत मोहिमेला प्रतिसाद
By admin | Published: January 06, 2015 1:01 AM