ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव येथे भाजपाचा आज विजय संकल्प मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनादिवशी 'एकला चलो रे'चा नारा देत भाजपावर तोफ डागली होती. त्यावर भाजपा आज प्रत्युत्तर देत काय बॉम्बगोळे टाकणार आहेत, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. भाजपाच्या विजय संकल्प मेळाव्यात पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
'युतीमध्ये राहुन आमची २५ वर्षे सडली. यापुढे जे काही असेल, ते माझ्या शिवसेनेचे, शिवसैनिकांचे असेल. महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये मी कुठेही युती करणार नाही. आता लढाई सुरू झाली आहे. आम्ही मुंबई, ठाणे, नाशिक सगळे जिंकणार. यापुढे राज्यात स्वबळावरच भगवा फडकविणार', असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले.
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या काडीमोडाच्या भूमिकेवर मुख्यमंत्री काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, युती तुटीची घोषणा केल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये पोस्टरवॉर रंगले आहे. शिवसेनेच्या ‘डीड यू नो’ पोस्टर्सना भाजपाने 'ह्याला जबाबदार कोण?' असे प्रश्न उपस्थित करत रस्ते, झोपडपट्टी, पाणी, कचरा वगैरे स्थानिक समस्यांवर भाष्य करणारे पोस्टर्स लावून शिवसेनेवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे.