मुंबई : भाषा सल्लागार समितीने राज्यासमोर ठेवलेल्या मराठी भाषाविषयक धोरणावर महाराष्ट्रातील विद्यापीठांतील मराठी भाषा विभागांच्या माध्यमातून चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा मराठी व्हावी, सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करावा, बालपणीच मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी उपक्रम व्हावेत, भव्य भाषाभवन असावे, मराठी शाळा अधिक सक्षम व्हाव्यात, त्यासाठी शिक्षकांची नेमणूक स्पर्धा परीक्षांद्वारे व्हावी, स्पेलचेकर यावा, स्कॅन केलेल्या मराठी मजकुरासाठी ओसीआर ची व्यवस्था व्हावी, सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये मराठीचा वापर अचूकतेने व परिपूर्णतेसह व्हावा, वेगळी बोली असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड कमी करण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात अशा असंख्य सूचना आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. या सूचनांचा अभ्यास करून एक कृती-आराखडा बनवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.११ ते २१ फेब्रुवारी या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, संत गाडगेबाबा विद्यापीठ, नाशिक एस. एन. डी. टी. विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ अशा ९ ठिकाणी भाषाधोरणावरील चर्चासत्रे पार पडली.
मराठी भाषा धोरणावरील चर्चासत्रांना राज्यभरातून प्रतिसाद
By admin | Published: February 25, 2015 2:20 AM