मुंबई : रस्ते प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनाचा चांगला मोबदला मिळत असल्यामुळे लोकांचा विरोध मावळत असून, लोक पुढाकार घेत आहेत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी प्रस्तावित पुणे-बंगळुरू नवीन महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होत असल्याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, याला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्र सरकारच्या सहकार्याने विकसित करण्यात येणारे राज्यातील रस्ते प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. महामार्गासाठी सुपीक जमिनी जाऊ नयेत, मात्र या महामार्गामुळे आसपासच्या परिसराची आर्थिक उन्नती होईल, असे त्यांनी सांगितले.अंबाजोगाई-गीता-जळगाव रस्त्याचा निर्णय लोकहितास्तवअंबाजोगाई-गीता-जळगाव हा बीड आणि जळगाव या दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता असून, या रस्त्याच्या बांधकामासाठी गळीत धान्य संशोधन उपकेंद्र अंबाजोगाई येथील जमिनीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर हा रस्ता हस्तांतरित करण्याबाबत कृषी विद्यापीठाने ठराव करून मान्यता दिली आहे. मात्र, गळीत धान्य संशोधन उपकेंद्र यांची जमीन कृषक अथवा अकृषक प्रयोजनासाठी न देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे लोकहितास्तव हा प्रश्न सोडविण्यासाठी कृषी विभागाची बैठक घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भातील संजय दौंड यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
चांगल्या मोबदल्यामुळे भूसंपादनाला प्रतिसाद; मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:10 AM