- यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय नेत्यांच्या सौभाग्यवती वलयांकित चौकट मोडून स्वत:चे वेगळे व्यक्तिमत्त्व घडवत असून, पतीच्या यशातही त्या मोलाचा वाटा उचलत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या सौभाग्यवतींशी बोलताना त्यांची राजकीय जाण किती प्रगल्भ आहे, याचा प्रत्यय तर आलाच, पण प्रचारामध्ये किती प्रचंड बांधिलकीने त्या योगदान देताहेत, यांचीही प्रचिती आली.राजकारणातील महिलांचा सहभाग हा मुख्यत्वे आपल्याच कुटुंबाची सत्ता कायम राहावी, म्हणून वा आरक्षणाची अपरिहार्य चौकट सांभाळावी लागते, म्हणून घेतला जातो, पण राज्यातील या पाचही दिग्गज नेत्यांच्या सौभाग्यवतींनी आपले कर्तृत्व सिद्ध करीत वेगळा पायंडा पाडला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता या बँकेत मोठ्या अधिकारी आहेत. निवडणूक आहे म्हणून त्यांनी रजा घेतलेली नाही. स्वत:च्या स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविलेल्या सामाजिक कार्यातही खंड पडू दिलेला नाही. हे करत असतानाच प्रचारात स्वत:ला झोकून देणाऱ्या पतीच्या पाठीशी त्या भक्कमपणे उभ्या असतात. त्यांचे शेड्युल सांभाळतात.
रश्मी ठाकरे यांना शिवसेनेत आज दिवंगत मीनाताई ठाकरेंच्या जागी बघितले जाते. शिवसैनिकांच्या घरातील अडचणी सोडविण्यापासून त्यांच्या सुखदु:खात त्या धावून जातात. प्रचारात एकाच वेळी उद्धवजी आणि पुत्र युवासेनाप्रमुख आदित्य यांच्या प्रचाराचे नियोजन त्या करतात. उद्धवजींना खाण्याचे काही पथ्य आहेत. दौऱ्यात सोबत असताना रश्मीताई थेट हॉटेलच्या शेफला जेवणाबाबत सूचना तर देतातच, कधी-कधी स्वत: उभे राहून त्याच्याकडून बनवूनही घेतात. रात्री उशिरा राज्यातील प्रचाराचा एकत्रित आढावा मातोश्रीवर घेतला जातो, तेव्हा त्या आवर्जून असतात.
सुनेत्रा अजित पवार यांना माहेर-सासरचा मिळून तीन दशकांच्या राजकारणाचा अनुभव आहे. यावेळी त्यांचा मुलगा पार्थ मावळमध्ये लढतोय. सुनेत्राताई लहान-मोठ्या सभा, मेळावे घेत मतदारसंघ पिंजून काढताहेत. पतीच्या कामाचा झपाटा हा त्यांचा आदर्श. बारामतीत सुप्रियातार्इंच्या प्रचारातही त्या फिरताहेत. दादांची पत्नी, सुप्रियातार्इंची वहिनी, पार्थची आई आणि मुख्य म्हणजे पवारसाहेबांची सून आदी भूमिकांत असतात. त्यांनी स्वत:चे व्यक्तिमत्त्वही घडविले.
अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता या २०१४ मध्ये आमदार झाल्या आणि यावेळी पतीच्या विजयासाठी नांदेडमध्ये रोज बारा-बारा तास फिरताहेत. भाषणे देतात, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, त्यांची विचारपूस, पतीच्या प्रचाराचे नियोजन त्या सांभाळतात.आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीतार्इंना समाजवादी विचारांचा प्रगल्भ वसा माहेरहून मिळाला आहे. आंबेडकरी विचारांची त्यांची बैठकही तितकीच पक्की आहे. भाजप आणि संघ परिवारावर सडकून टीका करताना त्यांच्या भाषणातून ते जाणवते. त्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी बाळासाहेब (प्रकाश) लढत असलेल्या अकोला मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. तेथे बुथ कमिट्यांपर्यंत पक्षाची बांधणी त्यांनी केली आहे.
मी विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा अधिक अॅक्टिव्ह असते. देवेंद्रजींच्या विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय असते. सध्या माझी भूमिका पडद्यामागची आहे. राज्यभर त्यांचे दौरे, बैठकी सुरू असताना त्यांची काळजी घेणे ही माझी सध्याची प्रायॉरिटी आहे.- अमृता देवेंद्र फडणवीसशिवसेना हे आमचे कुटुंबच आहे. या कुटुंबातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांबद्दल आपुलकीची भावना बाळगलीच पाहिजे, या भूमिकेतून मी वावरते. मी शिवसेना या परिवाराचीही काळजी वाहते, याचा मला अभिमान आहे.- रश्मी उद्धव ठाकरेमाझे सासरे शंकररावजी चव्हाण आणि पती अशोक चव्हाण यांचे गुडविल किती मोठे आहे, हे मला प्रचारात जाणवते. काँग्रेसची ध्येयधोरणे आणि सध्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या अपयशावर मी भाषणात सांगते.- आ. अमिता अशोक चव्हाणआमच्या पवार कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे. आता माझा मुलगा पार्थ हावारसा निश्चितपणे पुढे नेईल, याचामला विश्वासआहे. लोकांची आपुलकी बघितली म्हणजे आपल्या परिवाराने जो विश्वास कमावला, त्याचा अभिमान वाटतो.- सुनेत्रा अजित पवारपती राजकारणात सक्रिय असताना मी त्यांच्या पक्षात वा त्या माध्यमातून राजकीय लाभाचे पद मिळवू शकले असते, पण मी तो मोह टाळला. आंबेडकरी चळवळीत माझ्यापेक्षा अधिक योगदान देणाºया महिलांचा हक्क पहिला आहे, असे मी मानते. मी अकोला मतदारसंघात बाळासाहेबांच्या विजयासाठी झोकूनदिले आहे.- अंजली प्रकाश आंबेडकर